दूषित पाण्यामुळे मासेमारी संकटात
By admin | Published: July 20, 2014 10:44 PM2014-07-20T22:44:37+5:302014-07-20T22:45:55+5:30
ग्रामस्थ आक्रमक : तीव्र आंदोलनाचा इशारा
चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याबाबत अखिल दाभोळखाडी भोई समाज कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. वाशिष्ठी नदीत केमिकल सोडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत संबंधितांनी योग्य दखल न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अध्यक्ष आर. आर. जाधव यांनी दिला.
अखिल दाभोळखाडी भोई समाज, मुंबई शहर व ग्रामीण कार्यकारिणीची सभा गोवळकोट येथील भोईराज सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. लोटे एमआयडीसीतील केमिकल कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे वाशिष्ठी नदीपात्रातील मासे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे पारंपरिक मासेमारी बंद झाली आहे. भोई समाजाचा मुख्य व्यवसाय अडचणीत आला आहे. होड्या, जाळ्यांसाठी घेतलेली कर्ज थकीत झाली आहेत. खाडीतील मासे बाजारात येत नसल्याने समुद्रातील मासळीचे दर वाढले आहेत. लोटे एमआयडीसीच्या सीईटीपीतून दूषित पाणी सोडणे बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पारधी ,उदय जुवळे यांनी केले. यावेळी गोवळकोट सातगावचे अध्यक्ष मधुकर कासेकर, बबन कासेकर, मारुती मिंडे, चंद्रकांत कासेकर, राजेश सैतवडेकर, सचिन जुवळे, संतोष मिंडे, प्रमोद कासेकर, दीपक कासेकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अखिल दाभोळखाडी मंडळाचे कायकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.(वार्ताहर)
-गोवळकोट येथे अखिल दाभोळ खाडी भोई समाज कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय.
- खाडी प्रदूषणमुक्त करण्याबाबत संबंधितांना निवेदन देण्याबाबत चर्चा.
-नदीपात्रातील मासे मतुकीचे प्रमाण वाढतेय. या प्रकारामुळे परिसरातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
- प्रदूषणामुळे दाभोळ खाडी परिसरात मासेमारी पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप करीत प्रदूषणकारी कंपन्यांनी योग्य मार्ग न स्वीकारल्यास अखिल दाभोळखाडी भोई समाज, मुंबई शहर व ग्रामीण कार्यकारिणीने संताप व्यक्त केला आहे.
-गोवळकोट येथील बैठक प्रदूषणाच्या मुद्द्यावर गाजली. अशा सभांमध्ये नेहमी कंपन्यांना इशारा देण्यात यावा. ही संतापजनक गोष्ट असल्याचे व यापुढे प्रदूषणकारी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त मच्छिमारांनी केली आहे. निदान आता तरी काय करणार, याचे उत्तर हे बांधव संबंधितांकडे मागत आहेत.