वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 01:06 PM2020-11-07T13:06:58+5:302020-11-07T13:09:01+5:30

fishrman, boat, coastl, sindhdurgnews वादळी वारे वाहू लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे अनेक नौका बंदरांमध्ये नागरावर असून, मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत झाले आहे.

Fishing halted due to strong winds | वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका

वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका

Next
ठळक मुद्देवादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका पुन्हा वादळी वारे, नौका बंदरात उभ्या

रत्नागिरी : वादळी वारे वाहू लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे अनेक नौका बंदरांमध्ये नागरावर असून, मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत झाले आहे.

पंधरवड्यापूर्वी बंगालच्या उपसागरात सलग दोन वेळा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल झाला होता. सुमद्र खवळल्यामुळे मच्छिमारी बंद झाली होती. मागील आठ दिवसात हळूहळू वातावरण स्थिर होत असतानाच बुधवारपासून पुन्हा वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

आधीच समुद्रात जाऊनही मासळी मिळत नसल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत. त्यामुळे नौका बंदरात उभ्या ठेवण्यात आल्या होत्या. मासे मिळणार या आशेने मिरकरवाडा, राजिवडा, मिऱ्या, साखरतर, कासारवेली, जयगड, नाटे येथील काही नौकांनी समुद्रात धाव घेतली होती. मात्र, जाळ्यात काहीच न सापडल्याने ते रिकाम्या हाताने परतले. वादळ सरल्यानंतर मासे खोल समुद्रात किनाऱ्याच्या दिशेने येतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली.

दरम्यान, बिघडलेले वातावरण पूर्वीसारखेच होईल, अशा आशेवर मच्छिमार असतानाच पुन्हा गेल्या काही दिवसांपासून जोरदार, सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच परराज्यातील नौकांनी समुद्रात धुडगूस घातल्याने मच्छिमारांचे नुकसान होत आहे, अशी परिस्थिती असतानाच वातावरणात अचानक झालेल्या बदलाने मच्छिमार हवालदिल झाले आहेत. मासेमारी नौका नांगरावरच ठेवाव्या लागत असल्याने मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कोरोनामुळे पावसाळ्यापूर्वीचा हंगाम खराब गेला होता. त्यात अजूनही खलाशांचे प्रमाण कमी असल्याने मासेमारीला पुरेशी गती आलेली नाही. ज्यांच्याकडे खलाशी आहेत, त्यांची वाट वादळी वाऱ्यांनी अडवली आहे. त्यामुळे मचछीदार पुरते हवालदिल झाले आहेत. मासेमारीला लागलेले ग्रहण अजून सुटलेले नसल्याने हॉटेलमालकही अस्वस्थ आहेत.

परप्रांतीयांना रोखा

गेल्या काही दिवसांत परराज्यातील मासेमारी नौकांनी हजारो टन मासळी पकडून नेल्यामुळे स्थानिक मच्छिमारांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील मासळी उत्पादनामध्ये कायमची घट होणार आहे. त्यामुळे परप्रांतीय मच्छिमारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मच्छिमारांनी मत्स्य खात्याकडे केली आहे. आता गस्तीसाठी नौकाही उपलब्ध झाली असल्याने गतीने कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

Web Title: Fishing halted due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.