मुदतीआधीच मासेमारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:59+5:302021-05-31T04:22:59+5:30
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळानंतर खवळलेल्या समुद्रामुळे हंगामाच्या अखेरीस मच्छिमारांची निराशाच झाली आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी मासळी किनाऱ्याकडे ...
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळानंतर खवळलेल्या समुद्रामुळे हंगामाच्या अखेरीस मच्छिमारांची निराशाच झाली आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी मासळी किनाऱ्याकडे येऊ लागते. त्यामुळे हंगाम सरतेवेळी शेवटच्या दिवसांत मासे जाळ्यात सापडतात. मात्र, तौक्तेनंतर आलेल्या यास वादळाचाही वातावरणात परिणाम झाल्याने मुदतीआधीच मच्छिमारांना मासेमारी बंद करावी लागली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर माशांच्या निर्यातीवर बंधने आल्याने मासेमारी व्यवसाय आणखीच धोक्यात आला आहे.
मत्स्य खात्याच्या निकषानुसार कोकण किनारपट्टीवरील चालू मासेमारी हंगाम ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर १६ तारखेला तौक्ते चक्रीवादळ कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धडकले. त्यामुळे मासेमारीवर संक्रांत आली. वादळात नुकसान होऊ नये, यासाठी मच्छिमारांना हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. या सूचनेनुसार ४ दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती.
तौक्ते वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झालेली असतानाच यास वादळाच्या प्रभावाने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यास वादळ जिल्ह्यात धडकले नसले तरी समुद्र खवळलेला होता. त्यामुळे मच्छिमारांनी हंगाम संपण्यापूर्वीच गाशा गुंडाळला. मासेमारी मुदतीआधीच दिनांक १ जूनपूर्वीच बंद केल्याने त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाचा मासेमारी हंगाम दुष्काळातच गेल्याची प्रतिक्रिया मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जगण्याचा मोठा प्रश्न
कोरोना विषाणूच्या महामारीच्या अगोदरपासूनच गेली काही वर्षे जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाची समस्या भेडसावत आहे. मागील हंगामाप्रमाणेच लॉकडाऊनमुळे राहिलेला मत्स्य हंगामही हातून निसटला़. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा राहिला आहे.
हंगामाचे सुरुवातीचे दिवस वाया
दिनांक १ ऑगस्टपासून मासळीच्या हंगामाला सुरुवात होते. मात्र, चालू हंगामाच्या सुरुवातीलाच वादळाने तडाखा दिल्याने सुमारे १५ ते २० दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या मासळी हंगामात मासेमारी उशिरा सुरू झालेली असतानाच तौक्ते आणि यास वादळामुळे हंगाम संपण्यापूर्वीच मासेमारी बंद करावी लागली. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
नोव्हेंबरमध्ये वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटका
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात अचानक वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारी बंद ठेवावी लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला होता. त्यामुळे काही दिवस अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर ठेवण्यात आल्या होत्या. सततच्या वादळी वातावरणासह चालू हंगामात अनेकदा खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मच्छिमारांवर कर्जाचा बोजा वाढत चालला असल्याने ते मेटाकुटीला आले आहेत.