Ratnagiri news: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प, अपेक्षित दर नसल्याने मच्छीमार निराश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:28 PM2023-03-27T12:28:09+5:302023-03-27T12:28:29+5:30
कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता
रत्नागिरी : गेले काही दिवस समुद्र किनारच्या भागात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढत असल्याने हे मच्छीमार समुद्रात न जाता किनारी नांगरावरच राहणे पसंत करत आहेत.
कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर, सकाळी आणि सायंकाळी किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची अडचण झाली आहे.
वाऱ्यामुळे समुद्रात जाण्यासाठी छोट्या फायबर बोटींना इंधन अधिक लागते. त्या तुलनेत मासे मिळत नाहीत. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. खर्च करूनही जाळ्यात काहीच मिळत नसल्याने मच्छीमार बंदरावर थांबणेच पसंत करत आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अपेक्षित दर नाहीत
मोठ्या मच्छिमारांना बांगडा मिळत असल्याने ७० ते ८० रुपये किलो दर मिळत आहे. तुलनेत गिलनेटने पकडून आणलेल्या बांगड्याला अर्धाच दर मिळतो. अपेक्षित दर मिळत नसल्याने गिलनेटवाले मच्छीमार निराश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाकूळ मासा मोठ्या मच्छिमारांच्या जाळ्याला लागत आहे. सध्या त्याचा आकार छोटा असल्यामुळे त्याला दरही योग्य मिळत नाही.