फिटनेस फंडा - कोरोनाला हरवूच ‘वुई लव्ह अवर जिंदगी...!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:13+5:302021-05-29T04:24:13+5:30
‘माणूस हा आनंदी आहे, तोपर्यंतच, जोपर्यंत तो ठरवतो. त्याला याबाबत कुणीही थांबवू शकत नाही, हे वाक्य आहे, जगप्रसिद्ध अलेक्झांडर ...
‘माणूस हा आनंदी आहे, तोपर्यंतच, जोपर्यंत तो ठरवतो. त्याला याबाबत कुणीही थांबवू शकत नाही, हे वाक्य आहे, जगप्रसिद्ध अलेक्झांडर सोल्झेनिस्टीन यांचे. हे आठवण्याचं कारण दिल्लीतील एका रुग्णालयात एक ३० वर्षीय युवती कोरोनाग्रस्त, आजार विकोपाला गेलेला, पण ती शेवटपर्यंत सकारात्मक राहिली. शेवटच्या श्वासापर्यंत ‘आय लव्ह यू जिंदगी’ हे गाणं ऐकत होती. अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेतच ती थिरकत होती. सगळ्यांना वाईट वाटलं; पण कोरोनाला हरवूच, पिटाळून लावूच कारण आपण सर्वजण ‘वुई लव्ह अवर जिंदगी...!’ आपण आपल्या स्वत:च्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या जीवनावर प्रेम करतो...!
या प्रेमापोटीच आपण संशोधनातून सिद्ध झालेला, कुठलीही स्थिती असो, आपण त्या क्रीयात्मक, कृतिशील सूचना पाळू या. सुरक्षित अंतर, तोंडावर आणि नाकावर मास्क आणि हाताच्या स्वच्छतेकडे संपूर्ण लक्ष ठेवणे, सकारात्मकतेचा गुण वापरून गर्दीपासून दूर राहणे, आपण जीवनावर प्रेम करतोय, मग या साध्या सूचना सर्वांसाठी संजीवनी आहे. मग मात्र आपण आनंदी राहू, कारण जीवनाच्या प्रेमापोटी आपण हे ठरवलंच आहे. आरोग्य यंत्रणा आणि शासन यांनी यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
सर्वप्रथम काही महत्त्वाची लक्षणे याकडे वळूया. अर्थात ती आपल्याला पाठ झालेली आहे. पण उजळणी हवीच. नाही तर दुर्लक्ष होतं, पण घाबरून जाऊ नका, स्वत:हून चाचणी करून घेण्यात पुढाकार घ्या. गर्दीला बाजूला व्हा सांगण्यातही कचरू नका. एक तुमची सूचना म्हणजे कित्येक बाधित होऊ नये यासाठी उचललेले हे सार्थ पाऊल आहे, हे विसरू नका. अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर किंवा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आली; पण लक्षणे नाहीत. लगेच वैद्यकीय सल्ल्याने होम आयसोलेशन किंवा गृृह विलगीकरण किंवा गरजेनुसार आणि मार्गदर्शनानुसार कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर अॅडमिट व्हा. ऑक्सिमीटरवर तुमचे तज्ज्ञ, आशा सेविका किंवा संबंधित तुमची चाचणी घेतील. त्यावर एक खूण असते. त्याला ‘रेड फ्लॅग साइन’ असे म्हणतात. त्यात तुमची ऑक्सिजनची पातळी ९४ ते ९३ च्या दरम्यान किंवा खाली आली तर आपण अॅडमिट होणं आवश्यक असतं. त्यावेळेस आपली नाडी १०० हा आकडा दर्शविते.
यावेळेस तुम्हाला ही लक्षणे दिसतील, ताप येणे, कमी धाप लागणे किंवा श्वास घेण्यात अडथळा येणे. ९४ टक्क्यांपेक्षा कमी अशावेळी ऑक्सिजन पातळी असू शकते. छातीत दुखतं किंवा चोंदल्यासारखे वाटते किंवा दाब पडल्यासारखा वाटतो. ओठावर किंवा चेहऱ्यावर किंचीतशी निळसर छटा यायला लागते. जुलाब होतात. पोट फुगतं किंवा पोटात अस्वस्थ वाटतं. बोलणं अस्पष्ट होते. कधी आकडीही येते. मानसिक गोंधळ होतो. अशक्तपणा वाटतो. तीव्र प्रकारचा थकवा किंवा एखाद्या अवयवात बधिरता जाणवते. अशावेळी शासनाच्या १०८ अॅम्ब्युलन्सला फोन करा. ते ताबडतोब तुम्हाला घ्यायला येतील. कदाचित आपण खासगी शासनमान्य कोविड सेंटरमध्ये पण अॅडमिट व्हाल. जरूर व्हा, तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे करा; पण एक नक्की शासकीय यंत्रणेतील मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. तुमच्या वैद्यकीय सिस्टिमवर विश्वास ठेवा. तुमच्या या विश्वासाची ‘ज्योत’ तुम्हाला ‘जिंदगी’ देणार आहे.
साधारण तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पाचव्या दिवशी ऌ.फ.उ.ळ. स्कॅन स्कोअर करतात. या चाचणीत ० ते ८ हा सौम्य कोरोना समजला जातो. ९ ते १५ हा मध्यम आणि १६ ते २५ हा तीव्र स्वरूपाचा कोविड १९ समजला जातो. अशा चाचणीच्या गुणानुसार त्याची ट्रिटमेंट आणि काही रक्ताच्या चाचण्या यावरून मग आपले डॉक्टर्स कोरोना-१९ रोधक सिद्ध अँटिबायोटिक्स, ऑक्सिजन देणे इत्यादी तातडीने ठरवतात. कोरोनाच्या उपचारात एक शिस्त असते. त्यामुळे रुग्णाला धीर द्यावा. त्याला वारंवार भेटू नये. डॉक्टरच्या परवानगीशिवाय बिलकुल भेटू नये. तुमचा विश्वास डॉक्टरांना उपचारात मदतगार ठरतो.
रुग्ण अशावेळी घाबरलेला असणं हे सहज आहे. रुग्णाने मात्र स्वत:मध्ये जर तो समजण्याच्या मन:स्थितीत असेल तर त्याने शांतपणे डोळे बंद करून ‘मी बरा होतोय’ हा विश्वास मनात घोळवत राहावा, कारण माणसाच्या विचारशक्तीत आरोग्य आकर्षित करण्याची शक्ती असते. म्हणूनच तर बरं होण्याचा टक्का वाढीस लागलेला आहे..!
(क्रमश:)
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी