नेवरे येथे आजपासून पाच दिवसांची संचारबंदी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:22+5:302021-05-30T04:25:22+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवार, दि. ३० मे ...
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवार, दि. ३० मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, दि. ४ जूनपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत गावात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
ग्राम कृती दल, व्यापारी प्रतिनिधी व ग्रामपंचायत यांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. पाच दिवसात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दूध वितरण सकाळी ८ ते ९पर्यंत तासभरच सुरू राहणार आहे. औषधांचे दुकान सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आवश्यक सेवांव्यतिरिक्त रिक्षा बंद राहणार आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर दोनशे रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सर्व दुकाने व अवैध उद्योग (दारू, ताडी-माडी, मटका) बंद राहणार आहेत. नेवरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या विक्रेत्यांना पूर्णत: बंदी राहणार आहे.
संचारबंदी काळात सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, हे नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि होणाऱ्या कारवाईला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे ग्रामपंचायतीतर्फे कळविण्यात आले आहे.