संतापजनक! चिपळुणातील गुहागर बायपास रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे जिवंत अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 02:47 PM2022-01-01T14:47:19+5:302022-01-01T14:47:41+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने आणि असे कृत्य करणाऱ्या संबंधिताविरोधात संताप व्यक्त होत आहे.
चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रस्त्यालगत पाच दिवसाचे अर्भक आढळून आले आहे. स्त्री जातीचे हे अर्भक असून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला ते आढळून आले. या घटनेची येथील पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने आणि असे कृत्य करणाऱ्या संबंधिताविरोधात संताप व्यक्त होत आहे.
शहरातील उक्ताड ते पाग दरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्यालगत एका पिराजवळ हे अर्भक आढळून आले. पाच दिवसांचा अर्भक असून एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत ते होते. या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका तरुणाला या अर्भकाचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा तिथे त्याला एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत अर्भक दिसून आले.
त्याने तात्काळ पोलिसांना संपर्क करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला कामथे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे. या घटनेचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून पोलिसांच्या पथकामार्फत याबाबतची चौकशी सुरु केली आहे.
तसेच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही तात्काळ सुरू केली आहे. याबाबत नागरिकांना कोणतीही माहीती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी केले आहे.