‘सेतू’मधील पाच कर्मचाऱ्यांचे राजीनामे
By admin | Published: July 8, 2017 05:57 PM2017-07-08T17:57:45+5:302017-07-08T17:57:45+5:30
देवरूखमधील प्रकार : तहसीलदारांकडे मागणी
आॅनलाईन लोकमत
देवरूख (जि. रत्नागिरी), दि. ८ : अपुरे कर्मचारी व संगणकांची संख्यादेखील मर्यादित असल्याने कामात आधीच अडचणी, त्यातच राजकीय पदाधिकारी व लोक्रप्रतिनिधींचा देवरूखमधील ‘सेतू’ कार्यालयात वाढलेला हस्तक्षेप याला कंटाळून या कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व मानहानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले आहे. यामुळे ‘सेतू’चा कारभार गेले दोन दिवस तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच चालवत आहेत.
शैक्षणिक कामासाठी उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, अधिवास, राष्ट्रीयत्व व जातीचा दाखल्यांची आवश्यकता असते. पालक विहीत नमुन्यामध्ये आपला प्रस्ताव सेतू कार्यालयात दाखल करतात. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नागरिकांना संबंधित दाखला दिला जातो. दाखल्याविना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही वर्षापूर्वी सेतू कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, कार्यालयातील रिक्त पदे तसेच संगणकांचा अभाव यामुळे वाढलेले कामकाज करताना संबंधित कर्मचाऱ्यांना दमछाक होत होती.
कार्यालयात प्रामाणिक काम करत असतानाही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दबावाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून राजीनामे देण्याची वेळ आमच्यावर आल्याची कैफियत या निवेदनात येथील कर्मचारी निधी चव्हाण, प्राची भुवड, स्वप्नील मोरे, सोनाली करंडे यांनी मांडली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच या निवेदनाच्या माध्यमातून देवरुख तहसीलदारांकडे सादर केला आहे.
मे महिन्यापासून सेतू कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले देण्याचे प्रमाण वाढले आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, तैनात कर्मचारी सुटीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहून कामाचा निपटारा करतात. या कार्यालयाचे काम सुरळीत व्हावे यासाठी हे कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात. सध्या कार्यालयात दाखल्यांची संख्या जास्त व काम करण्यासाठी केवळ दोनच संगणक संच उपलब्ध आहेत. त्यातच इंटरनेट सुविधाही बंद असल्याने कामामध्ये अडचणी येतात.
प्रशासन राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बाजूने राहणार असेल तर यापुढे ‘सेतू’ कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा कार्यालयातील हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला असून, त्यांच्याकडून दबावतंत्राचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीत कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या चार कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावर आता तहसीलदार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. ‘सेतू’तील कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मंगळवारी व बुधवारी सेतू कार्यालयाचा कारभार तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चालवला. त्यामुळे सेतूचा प्रश्न आता देवरूखात चिघळणार आहे.