स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ५९ लाख लुबाडणारे आणखी पाचजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 03:00 PM2020-09-21T15:00:06+5:302020-09-21T15:01:06+5:30
दोन किलो सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावून ५९ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी ५ संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
खेड : दोन किलो सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावून ५९ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी ५ संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
ही घटना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील खेड तालुक्यातील उधळे गावच्या हद्दीतील जंगलात घडली होती. दोन किलो सोने केवळ ६० लाख रुपयांना देतो असे आमिष दाखवून वेरळ येथील अमर जड्याळ व अन्य तीनजणांना संशयितांनी उधळे परिसरातील जंगलात बोलावले होते.
या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या सात ते आठजणांनी सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्या चारही जणांना मारहाण करून दोन बॅगामध्ये असलेली ५९ लाख ६ हजार रुपयांची रोकड पळवून नेली होती. चोरीनंतर हे सर्व चोरटे म्हसळा परिसरात पळून गेल्याची माहिती खेड पोलिसांनी म्हसळा पोलिसांना दिली होती.
त्या माहितीच्या आधारे म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर दरोडा टाकून पळून गेलेल्या संशयितांची माहिती घेऊन तपास सुरू केला.
म्हसळा शहरातील नवानगर परिसरात हे पथक दबा धरून बसले. तसेच वेषांतर करून जवळच्या जंगलात लपून राहिलेल्या संशयितांचा शोध घेतला. अखेर नरेश वसंत चव्हाण, प्रमोद रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, अंकुश पंढरीनाथ चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या आता ७ झाली आहे. दरम्यान, या आधी ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमर जड्याळ याने याबाबत खेड पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दस्तुरी येथून विक्रात चव्हाण, तर सुकीवली येथून सिद्देश पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.