पाच प्रशिक्षणार्थी परिचारिका झाल्या कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 06:51 PM2020-05-27T18:51:39+5:302020-05-27T18:53:51+5:30
येथील नर्सिंग वसतिगृहामध्ये असलेल्या नऊ प्रशिक्षित परिचारिका कोरोनाबाधित झाल्या होत्या. या घटनेने नर्सिंग वसतिगृहामधील इतर प्रशिक्षणार्थी परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृह आणि परिसराला कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते.
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या पाच प्रशिक्षणार्थी परिचारिका कोरोनामुक्त झाल्याने त्यांना बुधवारी रूग्णालयातून सोडण्यात आले. उर्वरित चार परिचारिकांही कोरोनामुक्त झाल्या असून, त्यांना येत्या ३-४ दिवसांत रुग्णालयातून सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
येथील नर्सिंग वसतिगृहामध्ये असलेल्या नऊ प्रशिक्षित परिचारिका कोरोनाबाधित झाल्या होत्या. या घटनेने नर्सिंग वसतिगृहामधील इतर प्रशिक्षणार्थी परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृह आणि परिसराला कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते.
या नऊही प्रशिक्षणार्थी परिचारिकांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रूग्णालयाच्या डॉक्टर चमूने परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. त्यामुळे या परिचारिका आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित चार जणीहीही आता कोरोनामुक्त झाल्या असून, त्यांनाही लवकरच सोडण्यात येणार आहे.
बुधवारी या पाच परिचारिकांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिकत शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे, रूग्णालयाच्या परिचारिका, परिचर उपस्थित होते. या परिचारिकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.