चिपळूणमध्ये पूरसदृश स्थिती
By admin | Published: July 16, 2014 11:00 PM2014-07-16T23:00:44+5:302014-07-16T23:04:47+5:30
वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याची पातळी वाढ
चिपळूण : तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहात आहेत. वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शहराच्या काही भागात पाणी घुसले. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कामथे - टेरव रस्त्यावर झाड पडल्याने एस. टी.ची वाहतूक विस्कळीत झाली होती, तर पेठमाप येथे विजेच्या तारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
गेले दोन दिवस समाधानकारक पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. आज (बुधवार) सकाळी ८ वाजेपर्यंत १२१.७७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या हंगामात एकूण ९९९.१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सकाळी ७ च्या सुमारास चिपळूण बाजारपुलावरुन पाणी गेले. बाजारपुलाच्या दोन्ही बाजूला गुडघाभर पाणी साचले होते. नाईक कंपनी ते मच्छी मार्केट दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. शहरातील गटारांमधून निचरा न झाल्याने गटारे तुंबली होती. गटारातील पाणी रस्त्यावरुन वाहात होते. परकार कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावरुन पाणी जात होते. अनेक भागात रस्त्यावर पाणी आल्याने दुचाकी व छोट्या वाहनांना त्रास होत होता.
बाजारपूल ते पेठमाप परिसरात गटाराचे काम अपूर्ण असल्याने या रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला होता.
आज दिवसभर सरीवर पाऊस कोसळत होता. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत होता. उक्ताड येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात पाणी साचल्याने येथील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. पहिल्या पावसात अशी स्थिती झाली होती. दरवर्षी नाल्याची सफाई करुन पाण्याचा निचरा होत होता. परंतु, आज खूपच पाऊस पडल्याने शाळेच्या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस लागल्याने नद्यांना पूर आला आहे. धरपाण्याच्या लावणीला आज वेग आला होता. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.
या हंगामात प्रथमच पाणी भरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आणखी काही काळ सतत पाऊस पडला तर शहरात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दरडी घसरल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परंतु, जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)