खलाशांच्या पलायननाने नौका मालकांच्या अडचणीत भर
By admin | Published: April 3, 2016 10:16 PM2016-04-03T22:16:44+5:302016-04-03T23:34:59+5:30
पर्ससीन नेटवरील बंदी : शासनाच्या निर्णयाची अजूनही प्रतीक्षा
रत्नागिरी : पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी लादल्यामुळे गेला दीड महिना मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत.
या बंदीमुळे पर्ससीन नेट नौका मालक व त्यांचे कुटुंबिय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर याचा परिणाम आज मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक जोडधंद्यांवरही झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तरीही शासनाला जाग येत नसल्याने मच्छीमारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आल्याने छोट्या व पारंपरिक मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात मासे मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आताही मासे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने खवैय्यांचीही अडचण झाली आहे. त्याचबरोबर बाजारात मासे कमी येत असल्याने माशांचे दरही गगनाला भिडले आहेत. मासळी बाजारामध्ये माशांचे प्रमाण कमी झाल्याने चिकनचा दर वाढला आहे.
पर्ससीन नेटने मासेमारी केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी त्यासाठी लागणाऱ्या खलाशांसाठी नौका मालकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी लागणाऱ्या स्थानिक खलाशांची संख्या कमी पडते. म्हणून नौका मालक कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल वा अन्य राज्यांतून खलाशी आणतात. आता नेपाळी खलाशीही अनेक नौकांवर काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे खलाशी आणण्यासाठी नौका मालकांना परराज्यात फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा हजारो रुपये अॅडव्हान्स दिले जातात. ही रक्कम घेऊनही काही महिने काम करुन खलासी पोबारा करतात. त्यामुळे नौका मालकांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय खलाशांची संख्या कमी झाल्याने त्यांना स्वत:ला समुद्रात इतर खलाशांप्रमाणे जावे लागते. मासेमारी बंद झाल्याने नौकामालक अडचणीत सापडला आहे. या खलाशांच्या जेवणाचा खर्च तसेच त्यांना मासिक पगारासह हप्ताही द्यावा लागतो. हा खर्च भागवताना नौकामालकांना कसरत करावी लागत आहे. दीड महिन्यापासून नौका बंद असल्याने खलाशीही हैराण झाले आहेत. अशावेळी मालकांना साथ देण्यापेक्षा अनेक खलाशांनी पलायन केल्याचे नौका मालकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असताना खलाशांनीही पलायन केल्याने नौका मालक अडचणीत आला आहे. अनेक खलाशांना हजारो रुपये अॅडव्हान्स दिले आहेत. पलायन केलेल्या खलाशांकडून अॅडव्हान्स रक्कम वसूल कशी करायची, असा प्रश्न नौका मालकांना सतावत आहे. नौकामालक संकटात असताना त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. (शहर वार्ताहर)
फायदा कोणाचा : पारंपरिक की पर्ससीन नेटवाल्या मच्छीमारांचा
1या बंदीनंतर दीड महिन्याच्या कालावधीत छोट्या व पारंपरिक मच्छीमारांना मिळणाऱ्या मच्छिचे प्रमाण काय आहे. त्यांना किती आर्थिक फायदा झाला, याचा शासनाने जरुर अभ्यास करावा. कारण या बंदीनंतर बाजारपेठेतील अनेक व्यवसायांवर त्याचे दूरगामी परिणाम झाले. त्यामुळे याचा विचार शासनाने करुन पर्ससीन नेटवरील बंदीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
2पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी लादण्यात आल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. हजारो रुपये अॅडव्हान्स घेऊन खलासी पसार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नौका मालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी एक संकट
पर्ससीन नौकेवर २५ ते ३० खलासी लागतात. जिल्ह्यात खलासी मिळवताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नौकामालकांना अन्य राज्यांमधून खलाशांना आणावे लागते. त्यासाठी खर्चही मोठा असतो. खलाशांच्या पलायनाने मालकांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे.