goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 04:42 PM2021-12-31T16:42:01+5:302021-12-31T16:46:45+5:30

एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत.

Flood in Chiplun in the middle of 2021 | goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या

goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : गतवर्षापासून कोरोनाने आधीच आयुष्याला वेगळे वळण लावले असताना २०२१ या वर्षाच्या मध्यावर चिपळुणात आलेल्या महापुराने चांगलाच दणका दिला. एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत.

चिपळूण शहर व परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५ चा महापूर असो, त्या महापुराची एक सीमा ठरलेली होती. या सीमेच्या अंदाजाने चिपळुणातील बहुतांशी बांधकामे केली जातात. २००५ च्या महापुरानंतर येथे एक पूररेषाही निश्चित केली होती. साधारण समुद्र सपाटीपासून १२ मीटर उंचीवर चिपळूण शहर वसले आहे. तरीही २००५ ची पूररेषा यापुढे कधीही ओलांडली जाणार नाही, असेच अनेकांना वाटत होते.

परंतु यावेळेस पावसाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि होत्याचे नव्हते केले. चिपळूणच्या इतिहासात प्रथमच महापुराने एवढी मोठी उंची गाठली. आजपर्यंत कधीही न झालेले नुकसान या महापुरात अनुभवास आले. इतकी भीषणता व थरारक अनुभव अनेकांना पहिल्यांदाच आला. सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावाधीत झालेली अतिवृष्टी व त्याच वेळी आलेली भरती हेच महापुराचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

कोयना व नवाजा परिसरात २२ जुलै रोजी ७७६ मिलिमीटर, तर दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ६१० मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरात केवळ २ टक्के पाणी हे कोळकेवाडी धरणाचे होते. या कालावधीत चिपळूण परिसरात केवळ २०० मिलिमीटर इतकाच पाऊस झाला होता. तरीही चिपळूणवर एवढे मोठे संकट ओढवले.

वर्ष संपेल, पण या आठवणी संपणार नाहीत. केवळ चिपळूण, खेड आणि राजापूरच नाही तर अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना बसला.

Web Title: Flood in Chiplun in the middle of 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.