पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:21+5:302021-08-19T04:34:21+5:30
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील पोसरे येथील एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सुभाष ...
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील पोसरे येथील एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सुभाष आदावडे आणि सचिव ॲड. विजय हुंबरे यांनी प्रतिष्ठानच्यावतीने चिपळूणमधील पूरग्रस्तांना विविध वस्तूंचे वाटप केले. यावेळी एकता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सरपंच महेश आदावडे आदी उपस्थित होते.
प्रतिमेचे अनावरण
खेड : भारतरत्न पां. वा. काणे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी त्यांच्या जन्मगावी मुर्डे येथे भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने ग्रामपंचायत मुर्डे कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष शशांक सिनकर, अमोल गुहागरकर, सरपंच सोनाली जाधव आदी उपस्थित होते.
फाटक प्रशालेत वृक्षारोपण
रत्नागिरी : क्रांतिकारी चालक कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील फाटक प्रशाला येथे वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला. या संघटनेतर्फे रक्तदान, आरोग्य शिबिर, कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी उपक्रम याआधी राबविण्यात आले आहेत. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पालगड येथे वृक्षारोपण
दापोली : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या दापोली विभागातर्फे किल्ले पालगड येथे वृक्षारोपण मोहीम आणि पायवाट स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वेगवेगळ्या ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
तापसरी वाढली
राजापूर : सततच्या बदलत्या हवामानामुळे विविध भागांमध्ये तापसरीची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली असतानाच आता तापसरी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल जाणवू लागला आहे.
मोरी धोकादायक
सावर्डे : चिपळूणला काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरात ग्रामीण भागातील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, आजूबाजूच्या गावांचा संपर्कही तुटला आहे. याच दरम्यान सावर्डे ते तवसाळ रस्त्यावर आबीट गावी रस्त्यावरील मोरी खचली आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतकरी घेणार भेट
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी प्रक्रिया उद्योगाला उभारी मिळावी, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत भेट घेणार आहेत. जिल्ह्यात ३८८ काजू प्रक्रियाधारक आहेत. गेल्या काही वर्षांत रोजगार कमी होऊ लागला आहे. या अनुषंगाने या उद्योगाला उभारी मिळण्यासाठी शेतकरी नारायण राणे यांची भेट घेणार आहेत.
नेत्रदान सुविधा
रत्नागिरी : येथील लायन्स आय हॉस्पिटलने शहरात नेत्रदान सुविधेला प्रारंभ केला आहे. आतापर्यंत रत्नागिरीत मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असलेल्यांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्षात ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक दाते ही इच्छा पूर्ण करु शकत नव्हते. परंतु, आता लायन्स आय हॉस्पिटलने ही सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याने दृष्टीहिनांना त्याचा लाभ यापुढे मिळणार आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
रत्नागिरी : शहरामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने जागोजागी गवत वाढले आहे. तसेच अनेक भागांत गटारे उघडी असल्याने तसेच उघड्यावर टाकलेला कचरा यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोना पाठोपाठच मलेरिया, डेंग्यू वाढविणाऱ्या डासांना प्रतिबंध करण्यासाठी शहरात धूरफवारणीची गरज आहे.
दरडग्रस्तांना आर्थिक मदत
खेड : तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून १७ ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या बाधित ग्रामस्थांना नालंदा विकास मंडळाने बौद्धजन सहकारी संघ, हेदवी शाखा मुंबई व ग्रामीण यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष पोसरे येथे जात आर्थिक स्वरुपात मदत केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.