रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:17 PM2022-07-05T18:17:21+5:302022-07-05T18:18:20+5:30
गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी
राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे राजापूरात पुरस्थिती निर्माण झाली असून पुराच्या पाण्याने आज, मंगळवारी जवाहर चौकाला वेढा दिला आहे. तर पुराच्या शक्यतेने व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत.
पुराचा धोका लक्षात घेऊन राजापूर शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तर जवाहर चौकात येणारी एसटी वाहतुक सेवा बंद करण्यात आली आहे. आज, राजापूर तालुक्यात सरासरी १३४.२५ मिमी पावसाची नोंद झाली. तर या हंगामात एकुण १०१५.७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने मंगळवारी सायंकाळी अर्जुना नदीला पूर आला. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत वेगाने शिरू लागले. आज, सकाळपासून पुन्हा संततधार पर्जन्यवृष्टीमुळे झाल्याने पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा दिला आहे. शिवाजीपथ व चिंचबांध रस्ता पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेने राजापूर नगर परिषदेने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.