भातशेतीत पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:17+5:302021-07-29T04:31:17+5:30

संगमेश्वर: तालुक्यातील शेतीमध्ये पुराचे पाणी सलग दोन दिवस साचल्याने शेती चिखलमय झाली असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

Flood water in paddy fields | भातशेतीत पुराचे पाणी

भातशेतीत पुराचे पाणी

Next

संगमेश्वर: तालुक्यातील शेतीमध्ये पुराचे पाणी सलग दोन दिवस साचल्याने शेती चिखलमय झाली असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शास्त्री, सोनवी व बावनदी काठच्या हजारो एकरांच्या शेतीचे पुराचे पाण्यामुळे नुकसान झाले आहे. बावनदीकाठच्या कुरधुंडा, ओझरखोल, बावनदी, परचुरी, शास्त्री पूल, धामणी, आदी गावांतील शेतीला मोठा फटका बसला आहे.

आरोग्य कर्मचारी मदतीला

देवरुख : चिपळुणात आलेल्या महापुराचे पाणी कमी झाल्यानंतर जिकडेतिकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पुढील कालावधीत आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन देवरुख नगरपंचायतीचे १० आरोग्य कर्मचारी चिपळूण नगरपालिकेच्या मदतीसाठी रवाना झाले आहेत.

पूरग्रस्तांना खिचडी वाटप

रत्नागिरी : चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रसेविका समितीतर्फे खिचडीची एक हजार पॅकेट‌्स वितरित केली. रत्नागिरी व गोळवली येथील १५ सेविकांनी या मदतकार्यात सहभाग घेतला. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात खिचडी पॅकेट‌्स भरण्यात आली. तसेच आणखी अत्यावश्यक साहित्याची यादी करून त्याचेही पॅकिंग करण्यात आले.

भाज्यांचे दर कडाडले

संगमेश्वर : संगमेश्वरात भाज्यांचे दर कडाडले असून सर्वसामान्यांना भाजी घेणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. भाजीचा दर किलोमागे १२० ते १६० रुपयांनी अचानक वाढल्याने ग्राहकांनी धास्ती घेतली आहे. संगमेश्वरवासीय अजून पूरस्थितीतून सावरलेले नाहीत. कोरोनामुळे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यातच भाज्यांची आवक घटल्याने अचानक भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे.

जिल्हाध्यपदी देवघरकर

दापोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी दापोली तालुक्यातील असोंड येथील गणेश देवघरकर यांची निवड केली आहे. देवघरकर यांना जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

वृक्षांची लागवड

खेड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अस्तान गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सिद्धी पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील घेरारसाळगडावर ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

टाॅवर बंद

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने येथील भारत संचार निगमचा टाॅवर गेले आठवडाभर नादुरुस्त आहे. नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. देवरुख दूरध्वनी केंद्रात काम सुरू असल्याचे उत्तर दिले जात आहे. यामुळे परिसरातील मोबाईल ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शाळा, काॅलेज ऑनलाईन आहेत; परंतु नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

आमदार साळवींकडून मदत

राजापूर : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई ते राजापूर प्रवास करणारे राजापूर, लांजातील काही प्रवासी अडकून पडले होते. या प्रवाशांना प्रवासासाठी बस उपलब्ध करून देत आमदार राजन साळवी यांनी मदतीचा हात दिला आहे. लांजा, राजापूरमधील २८ प्रवासी वालोपे येथे अडकून पडले होते.

पावसाची विश्रांती

दापोली : दापोलीत गेले पंधरा ते वीस दिवस कोसळणाऱ्या पावसाने गेले दोन दिवस विश्रांती घेतली आहे. मात्र यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पाऊस गेला अन् उष्मा वाढला आहे.

Web Title: Flood water in paddy fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.