संगमेश्वर, फुणगूस, माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:29+5:302021-09-08T04:38:29+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ, कसबा, माखजन, फुणगुस बाजारपेठेत मंगळवारी पुराचे पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. शास्त्री, ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ, कसबा, माखजन, फुणगुस बाजारपेठेत मंगळवारी पुराचे पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. शास्त्री, सोनवी आणि गडनदीला आलेल्या पाण्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती झाली होती. तालुक्यात काही घरांची पाडझड झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गणेशोत्सवासाठी सजलेल्या संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर-रामपेठ, फुणगूस, कसबा, माखजन बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील गडनदीच्या पुराचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली आहे. सोमवारी सायंकाळपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने मध्यरात्रीपासून चांगलाच जोर धरला. त्यामुळे सकाळी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती.
गडनदीच्या पुरामुळे कासे, माखजन रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे माखजनहून कासे, कळंबुशी, नारडुवे, असावे, पेढांबे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. माखजन-कासे पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. संगमेश्वर आठवडा बाजारातही पाणी घुसले असून, लोवले, मयुरबाग, बुरंबी, गेल्येवाडी याठिकाणी राज्य मार्गावर दुपारी पाणी आले होते.
मौजे तुळसणी येथील नासीर गफार मुकादम यांचे पावसामुळे घराचे नुकसान झाले आहे. मावळंगे किसन शंकर कांबळे यांचा गोठा पडून अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तसेच सुभाष पांडुरंग वरेकर यांच्या घराच्या पडवीचे अंदाजे १६ हजार रुपये, धामापूरतर्फ संगमेश्वरमधील कल्याणी गमरे आणि चंद्रकांत गमरे यांचे प्रत्येकी २३ हजार ७५० रुपये, चोरवणेतील सागर पेडणेकर यांच्या घरावर झाड पडून ४५ हजार, मंदार कात्रे यांच्या विहिरीचे २५ हजार, सरंदमधील सुनीता जाधव यांच्या घराचे २५ हजार, रुपेश गोताड यांच्या घरातील इलेट्रॉनिक वस्तू जळाल्याने त्यांचे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची नाेंद तहसील कार्यालयात झाली आहे.
पावसामुळे आरवली-संगमेश्वर मुख्य विद्युत वाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे जवळपास संगमेश्वर तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
070921\img-20210907-wa0114.jpg~070921\img-20210907-wa0121.jpg
पुराचे पाणी~घरावर कोसळले झाड