चिपळुणातील पुराचे पाणी अखेर ओसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:49+5:302021-09-08T04:37:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी येथे मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे वाशिष्ठी व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी येथे मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे वाशिष्ठी व शिव नदीने रात्री उशिरा धोक्याची पातळी ओलांडली व बाजारपेठेतील काही भागात पुराचे पाणीही शिरले होते. मात्र पहाटे पावसाचा जोर कमी होताच पुराचे पाणी ओसरले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुणे येथील एनडीआरएफचे पथक येथे दाखल झाले होते.
येथे २२ व २३ जुलैला महापूर आला होता. त्यावेळी हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. परंतु पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १४ तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती. मात्र, आता पुन्हा पावसाचा जोर वाढतच असल्याने पुण्यातून एनडीआरएफचे पथक मागविण्यात आले होते. या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या उरात धडकी भरली होती.
पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी दुपारपासून दमदार पाऊस पडला. त्यामुळे रात्री ११ वाजताच वाशिष्ठी व शिव नदीने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ शहरात गाडी फिरवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हेही आपल्या सर्व पथकांसह सज्ज होते. परंतु, पहाटे ५ वाजल्यापासून पावसाचा जोर कमी झाला आणि सकाळी ७ वाजल्यापासून पाण्याची पातळी कमी होऊ लागली. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून पाऊस पूर्णतः थांबल्याने पुराचे पाणी ओसरले आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.