पुराखाली असलेल्या बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:47+5:302021-07-27T04:32:47+5:30
राजापूर : तालुक्यात गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार सायंकाळपासून विश्रांती घेतल्याने, अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ...
राजापूर : तालुक्यात गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार सायंकाळपासून विश्रांती घेतल्याने, अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. पात्र नियमित पातळीला आले असून, शहर बाजारपेठेतील पुराचे पाणी तीन दिवसांनंतर ओसरले आहे. पुरामुळे विस्कळीत झालेले शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे, तर तब्बल तीन दिवस पुराखाली असलेल्या शहर बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे.
राजापूर शहर आणि तालुका परिसरात चौदा दिवस संततधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला. पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस पुराच्या पाण्याने शहरात तळ ठोकला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे कोलमडलेले जनजीवन पूर्ववत सुरू झाले. शहर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकानांची नव्याने मांडणी केली. बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. शहरात भरलेल्या पुरामुळे बाजारपेठ, वरचीपेठ, शिवाजीपथ, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला होता. या भागात राजापूर नगरपरिषदेकडून चिखल काढणे व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली हाेती.