Ratnagiri: पावसाचा जोर वाढल्याने राजापुरात पुन्हा पूरस्थिती, अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली
By मनोज मुळ्ये | Published: July 26, 2023 01:38 PM2023-07-26T13:38:51+5:302023-07-26T13:39:35+5:30
पुराचे पाणी वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या
राजापूर : मंगळवारी दुपारपासून पुन्हा मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
गत आठवड्यात पावसाने जोर घेतला होता. त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पाऊस कोसळू लागला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सकाळी हे आदेश देण्यात आल्याने शाळेसाठी आलेल्या अनेक मुलांना लगेचच परतीचा प्रवास करावा लागला.