पूरमय चिपळूण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:55+5:302021-07-26T04:28:55+5:30

काय होतेय हे समजण्यापूर्वीच पाण्याने लोकांच्या राहत्या घराचा ताबा घेतला. आजपर्यंत उभे केलेले सारे वैभव तिथेच सोडून केवळ देह ...

Flooding Chiplun | पूरमय चिपळूण

पूरमय चिपळूण

googlenewsNext

काय होतेय हे समजण्यापूर्वीच पाण्याने लोकांच्या राहत्या घराचा ताबा घेतला. आजपर्यंत उभे केलेले सारे वैभव तिथेच सोडून केवळ देह आपला सोबती म्हणत जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावर जावे लागते. पाण्याने जवळजवळ २ मजले व्यापले. काही लोक छतावर जाऊन बसले तर काही इमारतीच्या गच्चीवर. अनेक लोकांचे पोट ज्यावर चाले अशी सारी दुकाने पाण्याखाली गेली. दुकानातील माल, दुचाकी, चार चाकी गाड्या साऱ्या साऱ्यांचे नुकसान झाले. आजपर्यंत हसत खेळत गर्दीत हरवलेली चिपळूणमधील ठिकाणे आज या प्रसंगाचे साक्षीदार होते. बहाद्दूर शेख नाका, पानगल्ली, चिपळूण बाजारपेठ ही ठिकाणे अशा परिस्थितीत पाण्याशी झुंज देत असलेली पाहताच चिपळूणकरांचे हृदयही द्रवलेच असावे. लोकांच्या सेवेसाठी सदा तत्पर असलेली लालपरी आपली एसटीदेखील पाण्याच्या लोटाने जणू लुप्तच झाली होती.

ही स्थिती लवकरात लवकर पूर्ववत आण देवा, अशी प्रार्थना करणे केवळ एवढेच आपल्या हाती उरले आहे. अनेक हात मदतीला धावून आले. बोटीच्या साहाय्याने मदतकार्य सुरू होते. पुराच्या ठिकाणाहून लोकांना हलवण्यात येत होते. एनडीआरएफचे पथकही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. वरून मुसळधार पाऊस थांबण्याचे नावही घेत नव्हता आणि खाली वाशिष्ठी नदीचे शहरात घुसलेले पाणी एवढ्या भयावह परिस्थितीतही कुठून बळ येते कुणास ठाऊक नाही, पण सरकार आणि लोकांनी या पुराचा सामना अगदी भक्कमपणे केला. आजूबाजूला असलेल्या महाड आणि खेड शहरातदेखील हीच परिस्थिती.

एक एक नवीन बातमी परिस्थितीची अधिक गंभीरता दाखवत होती. दरड कोसळत होत्या. काय आणि काय साऱ्या संकटाचे संमेलन जणू भरले होते. हा पाऊस थांबणे हा एकमेव उपाय राहिला होता. मुलेबाळांना, वयोवृद्ध आई-वडिलांना कसे आणि किती जपत या पुरातून वाट काढावी, हा मोठाच प्रश्न होता.

आता उरले ते पुराचे काही अंश आणि कष्टाने कमावलेल्या लोकांच्या स्वप्नांचे नुकसान. या क्षणी कुसुमाग्रजांचे ‘फक्त लढ म्हणा’ हे काव्य प्रखरतेने आठवते. या क्रूर पावसाने माणसाच्या डोळ्यातील अश्रूही वेगळे असे स्थान निर्माण करू दिले नाही. त्यांचेही रूपांतर पाण्यातच झाले व आता खरी गरज आहे ती नुकसानग्रस्त लोकांसाठी मदतीची. निसर्गाने सर्वांवर आणलेल्या संकटात होरपळली गेली ही पूरग्रस्त माणसे. जे जमेल ते देणे हे आपले कर्तव्यच आहे.

जुहिका शेट्ये, लांजा

Web Title: Flooding Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.