चिपळूण, खेड, राजापूरमधील पूरस्थिती कायम; मुंबई - गोवा महामार्ग ठप्पच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:04 PM2019-08-06T12:04:35+5:302019-08-06T12:05:06+5:30

सर्व शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

Floods persist in Chiplun, Khed, Rajapur; Mumbai Goa Highway traffic stop | चिपळूण, खेड, राजापूरमधील पूरस्थिती कायम; मुंबई - गोवा महामार्ग ठप्पच

चिपळूण, खेड, राजापूरमधील पूरस्थिती कायम; मुंबई - गोवा महामार्ग ठप्पच

Next

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील पूरपरिस्थिती कायम राहिल्याने शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन अजूनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे पोलादपूर येथे झाड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर जिल्ह्यात घाट माथ्यावरून येणारा भाजीपाला न आल्याने बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले आहेत.

जगबुडी पूल बंदच
खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरुच असून, जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. बाजारपेठेत पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात. गांधी चौक, सफा मस्जिद, वाल्की गल्ली, निवाचा चौक या ठिकाणी खूप वेगात पाणी भरण्यास सुरुवात.  खेडमधील सर्व शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

चिपळूण बाजारपेठ सलग आठव्यांदा पाण्यात

चिपळूणला सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याचा वेढा राहिला आहे. चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पूर भरला असून, येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहादुरशेख पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चिपळुणातील नागरिकांना तब्बल आठवेळा पुराचा सामना करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी, शिवनदी धोक्याची पातळी ओलांडत असल्याने चिपळूण बाजारपेठेत हळूहळू पाणी शिरण्यास सुरुवात होते. जुना बस स्थानक, चिंचनाका, अनंत आईस फेक्ट्री, वडनाका, वेस मारुती मंदिर, बहादूरशेख नाका, तर जुना बाजारपूल परिसर तसेच खेर्डी परिसरात पाणी साचत आहे.

राजापुरातही पूर

राजापूर शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे पाणी अजूनही कायम असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेतही अजून पाणी असल्याने कोणीही नागरिक घरातून बाहेर पडलेले नाहीत.  पावसामुळे तालुक्यातील एस्. टी. बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा मंगळवारीदेखील भरल्या नव्हत्या. मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने अनेक शिक्षकांना आपल्या शाळेवर जाता आलेले नाही.  ग्रामीण भागातील अनेक रस्ते खचल्याने हे मार्ग धोकादायक बनले आहेत. तालुक्यातील तिठवली येथील रस्ता मंगळवारी खचल्याने हा रस्ता धोकादायक आहे.

डिझेलअभावी लांजात बससेवा ठप्प
लांजा तालुक्यात मंगळवारीही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, अद्यापही जनजीवन विस्कळीत आहे. मुंबई - गोवा महामार्ग बंद पडल्याने तालुक्यात डिझेलच्या गाड्या आलेल्या नाहीत. त्यामुळे एस्. टी. सेवा बंद पडली आहे. 

मंडणगड, दापोली, गुहागरात पावसाचा जोर ओसरला
तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दापोली आणि गुहागरातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

संगमेश्वरातील पूर ओसरला
संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर ओसरल्याने संगमेश्वर बाजारपेठेतील पुराचे पाणी ओसरले आहे. पण, पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पुन्हा पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापारी सतर्क झाले आहेत. तालुक्यातील माखजन, फुणगूस या भागातील पुराचे पाणी अद्यापही जैसे थेच आहे.

भाजीपाला बंद
रत्नागिरी जिल्ह्यात घाटमाथ्यावरून मोठ्याप्रमाणात भाजीपाला दाखल होतो. मात्र, रत्नागिरी - कोल्हापूर, चिपळूण - कराड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणाºया भाजीपाल्याच्या गाड्या येऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांची टंचाई जाणवू लागली आहे. घाटमाथ्यावरून येणारी भाजी न आल्याने स्थानिकांनी आपल्याकडे असणाºया  भाज्यांच्या किंमतीत वाढ केली आहे.

Web Title: Floods persist in Chiplun, Khed, Rajapur; Mumbai Goa Highway traffic stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.