विकासाचा केंद्रबिंदू धोकादायक
By Admin | Published: February 12, 2015 11:57 PM2015-02-12T23:57:45+5:302015-02-13T00:49:34+5:30
इमारती मोडकळीस : २०४ ग्रामपंचायतींचा विकास कधी होणार?
रहिम दलाल -रत्नागिरी ग्रामीण भागातील गावांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारती फार जुन्या असून, त्यांचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १९ लाख २०६१ असून, त्यापैकी १५ लाख ४४१ लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात ८४४ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत़ या योजनांमध्ये पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, यशवंत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामसचिवालय योजना व अन्य योजनांचा समावेश आहे़ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असताना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करुन शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत़ त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे़
ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या इमारती २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या आहेत़ या धोकादायक असलेल्या ग्रामपंचायतींच्या इमारतींमधून केवळ ४३ ग्रामपंचायतींना नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. या प्रत्येक ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींसाठी १० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामपंचायत जनसुविधासाठी विशेष अनुदानातून २३ ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनमधून २० ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत.धोकादायक असलेल्या या ग्रामपंचायतींच्या इमारतीचे छत मोडकळीस आले असून, काही इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत़ ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये कर्मचारी व लोकप्रतिनिधी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्र भिजल्याने जुनी कागदपत्र खराब होत आहेत़ त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे़एकीकडे गावच्या विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़
भाड्याच्या जागेत इमारती
जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ८३६ ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीची कार्यालये आहेत. उर्वरित ८ ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामध्ये खेडमधील ४, चिपळुणातील २ आणि खेड व लांजातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ या ग्रामपंचायती भाड्याच्या जागेत आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणाऱ्या ग्रामपंचायतींच्या इमारती डळमळीत झालेल्या असतानाही त्यांना पुरेसा निधी नाही. त्यामुळे त्यांची कामे टप्प्याने घेण्यात येत आहेत. धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शासन त्यांच्या बांधकामासाठी पुरेसा निधी कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राजीव गांधी भवन या योजनेतून ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींसाठी १२ लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यातून २ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींची कामे घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेतून ११ ग्रामपंचायतींना नवीन इमारती देण्यात येत असून, आणखी १३ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत.
तालुका ग्रामपंचायत इमारती
मंडणगड१२
दापोली४५
खेड२१
चिपळूण२४
गुहागर१४
संगमेश्वर१३
रत्नागिरी२०
लांजा१०
राजापूर१२
एकूण१७१