चिपळूणच्या तळीरामाला भोवली धुंद, नशेत भलतीच पळवली गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:24 PM2020-11-11T19:24:18+5:302020-11-11T19:26:05+5:30
liquerban, crimenews, police, chiplun, ratnagirinews गेल्या काही दिवसांपासून चिपळुणात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच मंगळवारी सकाळी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या परिसरात पार्किंग करून ठेवलेली दुचाकी चोरत असताना सतर्क नागरिकांनीच या चोरट्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलीस चौकशीत हा प्रकार चुकून घडल्याचे समोर आले.
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून चिपळुणात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच मंगळवारी सकाळी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या परिसरात पार्किंग करून ठेवलेली दुचाकी चोरत असताना सतर्क नागरिकांनीच या चोरट्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलीस चौकशीत हा प्रकार चुकून घडल्याचे समोर आले.
काही दिवसांपूर्वी शहरातील परशुराम नगर येथे घरफोडीची घटना घडली होती. त्यावेळीही चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या होत्या. त्यानंतरही दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. कळंबस्ते येथे दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. कळंबस्ते येथील अरविंद बाळकृष्ण पाटील (५९) यांनी याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी काणे बंधू हॉलसमोर रविवारी रात्री ११.३० वाजता आपली दुचाकी (एमएच ०८, एटी ८२९१) उभी करून ठेवली होती.
अधिक तपास खेर्डी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देसाई करीत आहेत. तसेच तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथील जब्बार इब्राहिम लगीवले यांच्या घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळवून नेण्याची घटना रविवारी घडली. याबाबत अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी वालोपे येथे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पार्किंग करून ठेवलेली दुसऱ्या व्यक्तीची दुचाकी घेऊन जात असताना एक तरुण काही नागरिकांना आढळून आला. गाडी चोरीत असल्याचा समज करून त्याला तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने आपल्या गाडीची चावी चुकून दुसऱ्या गाडीला लागल्याचे सांगितले. पोलिसांची याबाबत खात्री पटताच त्याला सोडून देण्यात आले.