लोककलेला राजाश्रय मिळवून देणार : पुरुषोत्तम बेर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:28 PM2020-12-07T12:28:43+5:302020-12-07T12:30:40+5:30
Natak, Culture, PurshotamBerde, Ratnagirinews नाट्यक्षेत्र जगता-जगता सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपला मानस आहे. त्यामुळे लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही नाट्य दिग्दर्शक, निर्माता पुरूषोत्तम बेर्डे यांनी दिली. यावेळी त्यांनी स्थानिक कलाकारांच्या कलेलाही दाद दिली.
रत्नागिरी : नाट्यक्षेत्र जगता-जगता सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपला मानस आहे. त्यामुळे लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही नाट्य दिग्दर्शक, निर्माता पुरूषोत्तम बेर्डे यांनी दिली. यावेळी त्यांनी स्थानिक कलाकारांच्या कलेलाही दाद दिली.
पुरुषोत्तम बेर्डे हे रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, भजन या कलेविषयी माहिती घेण्यासाठी आले होते. त्यानिमित्ताने टिके - कांबळेवाडी येथे कोकण नमन कला मंचतर्फे त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात कोकण नमन कला मंचचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, अध्यक्ष पी. टी. कांबळे, सचिव विश्वनाथ गावडे, सुरेश होरंबे यांनी पारंपरिक नमन कलेबाबत पैलूंचा उलगडा करताना आपला बाज न सोडता आधुनिकतेची कशी झालर लावली जात आहे, त्याची माहिती दिली. वासुदेव वाघे यांनी भजन, नमन, जाखडी तसेच बेंजो कलापथकांनाही शासनाकडून मदत मिळायला हवी, असे सांगितले.
यावेळी टिके सरपंच साक्षी फुटक, उपसरपंच भिकाजी शिनगारे, सदस्य सुरेश फुटक, नेहा सांडीम, प्रभावती फुटक, शंकर वाडेकर, प्रवीण सावंतदेसाई, राकेश बेर्डे, लक्ष्मीकांत हरियाण, कोकण कला नमन मंडळाचे पदाधिकारी, रत्नागिरी तालुका व आभार सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ संचलित जिल्हा प्रासादिक भजन मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.