बेकायदेशीर गावठी बंदूक प्रकरणाची पाळेमुळे पाेहाेचली सिंधुदुर्गापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:39+5:302021-05-14T04:31:39+5:30
दापोली : तालुक्यातील साकुर्डे शिकार प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, विनोद बैकर यांच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या बेकायदेशीर गावठी बंदुकीच्या तपासप्रकरणी ...
दापोली : तालुक्यातील साकुर्डे शिकार प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, विनोद बैकर यांच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या बेकायदेशीर गावठी बंदुकीच्या तपासप्रकरणी पोलिसांना गावठी बंदुकीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे़ त्याची पाळेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत.
तालुक्यातील वेगवेगळ्या गावांत छापे टाकून दापोली पोलिसांनी सोळा बंदुकी जप्त केले आहेत़ या प्रकरणात दापोली तालुक्यातील दहा जणांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथील नानू पेंडुरकर यांना अटक केली आहे़
दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दापोलीत पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली़ गैरकायदा विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्या अमित रहाटे (बोंडआळी) सौरभ मस्कर, (मौजे दापोली), अभिषेक जाधव (जालगाव), सौरभ गवळी (जळगाव), विजय आंबेड (मौजे दापोली), नरेश साळवी (करंजाळी), विश्वास कांसे (मौजे दापोली), नीलेश कातरकर (खेर्डी), प्रशांत पवार (माते गुजर), अनंत मोहिते (कोळबांद्रे) यांना विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता सर्वांना जामिनावर सोडण्यात आले आहे़
अमित रहाटे (रा़ शिवाजीनगर, भोंगळी) यांच्याकडून सिंगल नाडीच्या सोळा बंदुका विनापरवाना नानू पेंडुरकर (रा़ पेनुर, ता़ कुडाळ) यांच्याकडे खरेदी केली हाेती़ त्यानंतर त्याने अनेकांना या बंदुका वाटल्या हाेत्या़ पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने बंदुका या गैरकायदा असल्याचे माहीत असताना आपली जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले आहे तसेच या संशयित आरोपींकडून सोळा गावठी बंदुका जप्त करण्यात आले आहेत तसेच या प्रकरणाचे धागेदोरे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नानू तेंडुलकर याला दापोली पोलिसांनी अटक केली आहे
दापोली पोलिसांनी गैरफायदा विनापरवाना सिंगल गोळीची बंदूक वापरल्याप्रकरणी संशयित राजाराम भोवड (गिम्हवणे) यांच्याकडून छापा टाकून गावठी बंदूक जप्त केले आहे़ दुसऱ्या प्रकरणात राजाराम ऊर्फ राजू भवर (४२, रा़ गिम्हवणे), अशोक कलम (रा़ जालगाव, ब्राह्मणवाडी), अनंत माेहिते (रा़ जालगाव)यांनाही संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे़
--------------------------------------
दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे ३१ मार्चला शिकारीला गेलेल्या विनोद बायकर याचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता़ मात्र, ही बंदूक विनापरवाना असल्याचे तपासातून समोर आले होते़ ही बंदूक कुठून आली याचा तपास दापोली पोलीस घेत होते़ या तपासादरम्यान विनोद भाईकर हे एकटेच शिकारीसाठी गेले नव्हते तर त्यांच्यासोबत अन्य दोघेजण असल्याचे तपासात समोर आले हाेते़ त्यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पाळेमुळे खाेदून काढली आहेत़