मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग केवळ २० टक्केच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता
By शोभना कांबळे | Published: September 6, 2023 07:02 PM2023-09-06T19:02:08+5:302023-09-06T19:25:41+5:30
गावागावांमध्ये कॅम्प घेणार
रत्नागिरी : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग हवा तेवढा नाही. ८० ते ८५ टक्के मतदारांचे नाव मतदार यादीतच नाही, ही सशक्त लोकशाही होण्यासाठी चिंताजनक बाब आहे, असे मत रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले राज्याचे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांची संख्या वाढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. आज, बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे रत्नागिरीत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्याच्या आढावा घेतला. या कार्यक्रमाची तसेच मतदार जनजागृती याविषयी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, परिविक्षाधीन अधिकारी डाॅ. जस्मीन उपस्थित होते.
मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही उदासीनता असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. हे मतदार वाढण्यासाठी केवळ आयोगाचे नव्हे तर सर्व राजकीय पक्षांकडून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गावागावांमध्ये कॅम्प घेणार
मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रमाविषयी माहिती देताना देशपांडे म्हणाले की, हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा तयार असाव्यात यासाठी महाराष्ट्रभर जिल्हा निहाय आढावा आयोगाकडून घेतला जात आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचा हेतू या याद्या निर्दोष करणे तसेच नवमतदारांना समाविष्ट करणे हा आहे. लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधीक मतदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्या या प्रक्रियेत १८ -१९ वयोगटातील नवमतदारांची संख्या अतिशय अल्प दिसते. मतदार वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून शाळा - महाविद्यालये तसेच गावागावांमध्ये कॅम्प घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.