गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणातील गावाकडे निघाले, ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली; एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:00 IST2023-09-18T11:50:23+5:302023-09-18T12:00:50+5:30
सौरभ हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा व हरहुन्नरी एकुलता एक मुलगा होता

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणातील गावाकडे निघाले, ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली; एकाचा जागीच मृत्यू
देवरुख : गणेशाेत्सवासाठी मुंबई - अंधेरी येथून दुचाकीने आपल्या घरी यायला निघालेल्या साडवली - भुवडवाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला. हा अपघात ओव्हरटेक करताना रविवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ८:३० च्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावरील खेरशेत (ता. चिपळूण) येथे झाला. सौरभ सुरेश शिगवण (२३) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सौरभ हा गेली दोन वर्ष मुंबई येथे कामाला होता. गणेशोत्सवासाठी तो आपल्या साडवली येथील घरी येण्यासाठी दुचाकीने निघाला होता. त्याच्यासाेबत त्याचा मित्र देवेंद्र रावणंग (२१, रा. देवरुख) हा हाेता. मुंबई - गोवा महामार्गाने प्रवास करत असतानाच संगमेश्वर तालुक्याची हद्द येण्यापूर्वीच खेरशेत येथे ओव्हरटेक करताना दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये सौरभ शिगवण याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या साेबत असलेला मित्र देवेंद्र जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सौरभ हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा व हरहुन्नरी एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. ताे आपल्या कुटुंबीयांचा आधार बनला होता. गणेशोत्सवाच्या तोंडावरच झालेल्या या अपघातामुळे शिगवण कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर भुवडवाडीवर शोककळा पसरली आहे.
सौरभच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.