आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्याची ग्रामपंचायतींवर सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:36+5:302021-09-25T04:34:36+5:30
रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत बचत खाते उघडण्याची ...
रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत बचत खाते उघडण्याची सक्ती ग्रामपंचायतींना करण्यात येत आहे. गावपातळीवर या बँकेच्या शाखा कार्यरत नसताना आणि सध्या अन्य बँकेत खाती उघडली असतानाही या बँकेत बचत खाते उघडण्याची सक्ती कशासाठी, असा प्रश्न ग्रामपंचायतींकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रकल्प, योजनांमधील कंत्राटदार व इतर लाभार्थ्यांना निधीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने करुन निधी वितरणाची प्रक्रिया डिजिटल व कॅशलेस पद्धतीने शासनाचे धाेरण आहे. या धोरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी पीएफएमएस प्रणालीवरुन वितरित करणे बंधनकारक केले आहे. तसेच हा निधी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने आयसीआयसीआय बँक पीपीआयसाठी हँडहोल्डिंग सपोर्ट देण्यास बँक तयार असल्याने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने कळविले आहे.
आयसीआयसीआय बँकेचे बचत खाते उघडण्यास शासनाने सांगितले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना ग्रामविकास विभागाने आदेश काढले असून, पुढील १५ दिवसांत आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्यास सांगितले आहे. या निर्णयास अनेक ग्रामपंचायतींकडून विरोध दर्शविला आहे. शिवाय अन्य बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. आयसीआयसीआय बँकेत बचत खाते उघडण्याची सक्ती कशासाठी असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित केला आहे.