खवटी नजिक विदेशी दारु जप्त, ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त, रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By शोभना कांबळे | Published: May 3, 2023 01:03 PM2023-05-03T13:03:26+5:302023-05-03T13:13:37+5:30
याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला
रत्नागिरी : खेड तालुक्यातील खवटी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी मोहिमेत विदेशी मद्याचे ५०० बाॅक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत वाहनासह ४७ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल, मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके, गस्ती मोहिम राबविण्यात आली. उत्पादन शुल्क विभाग खेडच्या निरीक्षकाना मिळालेल्या माहितीनुसार, खवटी गावच्या हददीत हॉटेल सृष्टी धाबा समोर सापळा रचण्यात आला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करीत असता टेम्पो क्रमांक (MH- 04 GF/ ९३०५)मध्ये संशयास्पद माल आढळला. यावेळी तपासणी केली असता विदेशी मद्याचे बॉक्स आढळले. या कारवाईत गाडीसह ४७,७३,००० एवढया किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी ट्रकचालक प्रेमकुमार जेठाराम थोरी (रा . जेठाराम थोरी, लालेकी बेरी बाँड, बारनेर राजस्थान) याला ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे निरीक्षक सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक महादेव आगळे, जवान अनुराग बर्वे, जवान वाहन चालक अतुल वसावे तसेच भरारी पथक साताराचे जवान अमोल खरात यांनी ही कारवाई केली. यासाठी गणपत जाधव व विजय सावंत यांचे सहकार्य मिळाले. निरीक्षक सुनिल आरडेकर पुढील तपास करीत आहेत.