परदेशातील नागरिकांना भारतीय फराळाची चव!
By Admin | Published: October 27, 2016 10:36 PM2016-10-27T22:36:15+5:302016-10-27T23:20:41+5:30
कुरिअरकडे गर्दी : नोकरी, शिक्षणासाठी गेलेल्यांना फराळाबरोबरच अभ्यंगस्नानाचे उटणे रवाना
रत्नागिरी : दीपावलीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. अनेक भारतीय मंडळी परदेशात नोकरीसाठी कार्यरत आहेत, तर शिक्षणासाठी गेलेल्या युवा मंडळींची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशातील मंडळींना दीपावलीचा आनंद घेता यावा, यासाठी फराळ, कपडे तसेच अभ्यंगस्नानासाठी उटणे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या कुरियर व्यावसायिकांकडे ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे.
सौदी अरबमध्ये १९ लाख, तर संयुक्त अरब अमिरातमध्ये ३५ लाख भारतीय विविध ठिकाणी सेवेत आहेत. अमेरिका, इग्लंड व अन्य विविध देशात नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक भारतीय आहेत. मर्चंट नेव्हीतही लाखो मंडळी कार्यरत आहेत.
परदेशात विविध ठिकाणी मर्चंट नेव्हीतील मंडळींचा समुद्रमार्गे जहाजाव्दारे प्रवास होतो. जहाजावर काम करणाऱ्यांना परदेशातील एखाद्या किनाऱ्यावर जहाज थांबले तरी कॅप्टनच्या परवानगीशिवाय कोठेही खरेदीसाठी जाता येत नाही. त्यामुळे मर्चंट नेव्हीतील मंडळींनाही सणाचा आनंद सहकारी मित्रांसोबत घेता यावा, यासाठी भारतातील कुटुंबाकडून फराळ व अन्य साहित्य पाठवले जाते.
५९५ रूपये किलो व अन्य कर मिळून किलोला हजार ते पंधराशे रूपये खर्च येतो. कुरिअर पाच ते सहा दिवसात परदेशातील पत्त्यावर पोहोचते. त्यामुळे १५ तारखेपासूनच कुरिअरसाठी गर्दी सुरू झाली आहे. अनेक भारतीय बांधव, कुटुंबीय आपापल्या नातेवाईकांसाठी कुरिअरद्वारे फराळ व अन्य वस्तू पाठवत आहेत. त्यामुळे कुरिअर व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. भाऊबीजेपर्यंत कुरिअरसाठी गर्दी राहणार असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
परदेशातूनही भारतातील कुटुंबीयांसाठी भेटवस्तू कुरिअरव्दारे पाठवण्यात येत आहेत. सणापूर्वी वस्तू पोहोचाव्यात, यासाठी कुरिअर व्यावसायिक सध्या प्रचंड व्यस्त आहेत. तसेच दीपावलीच्या सुटीतही सुटी घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या कालावधीत ही गर्दी आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
ठराविक वस्तूंनाच परवानगी
परदेशात काही ठिकाणी केवळ नामवंत कंपन्यांच्या वस्तू पाठवल्या जाऊ शकतात. काही ठिकाणी लिक्विडसारख्या वस्तूंना मज्जाव आहे. घरगुती पदार्थही काही ठराविक देशात पाठविणे शक्य नाही. काही मोजक्या देशात घरगुती पदार्थ पाठवण्यास मुभा असल्याने फराळाच्या जिन्नसपैकी काही जिन्नस पाठवण्यात येत आहेत.