Ratnagiri: टेरव येथील कोळसा भट्ट्यांवर वन विभागाच्या धाडी, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:20 PM2024-12-03T16:20:39+5:302024-12-03T16:21:00+5:30
४७ घनमीटर लाकूड जप्त
चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील ग्रामस्थांनी गावातील कोळसा भट्ट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वन विभागाने टेरव येथील जंगलात धुमसत असणाऱ्या कोळसा भट्ट्यांवर धाडी टाकल्या. या धाडीत तेथील लाकूडसाठा आणि कोळसा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार केली जात होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक ग्रामस्थांनी याविरोधात आवाज उठवला होता. वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही त्याकडे कानाडोळा केला जात होता. मात्र, ग्रामस्थ कारवाईसाठी ठाम होते. त्यानुसार वन विभागाने शनिवार, ३० नोहेंबर रोजी टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्ट्यांवर धाड टाकली.
या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला. टेरव येथील संतोष कदम, बाबुराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष कदम यांनी विनापरवाना जंगलतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ४७ घनमीटर लाकूड जप्त केले आहे.
कोळसा भट्टी लावण्यास बंदी असतानाही कोळसा भट्ट्या लावल्याप्रकरणी बाबुराव कदम व नागेश कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. येथील परिक्षेत्र वन अधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कोळसा जप्त करण्यात आला असून, कारवाईचा तपशील वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
टेरव येथे सातत्याने कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. गतवर्षीही येथे कोळसा भट्ट्या लागल्या असतानाही वन विभागाने त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे कोळसा भट्ट्यांबाबत टेरव ग्रामस्थ आक्रमक होते. आता कारवाईनंतर या भट्ट्या कायमस्वरूपी विझणार की पुन्हा धगधगणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.