वन विभागातर्फे होणार ४५० सागाची लागवड
By admin | Published: June 17, 2016 09:55 PM2016-06-17T21:55:39+5:302016-06-17T23:33:30+5:30
विलास मुळ्ये : संगमेश्वर - कोसुंब येथे राबवणार उपक्रम
देवरूख : वन महोत्सवाचे औचित्य साधून देवरूख वन विभाग कार्यालयाच्यावतीने १ जुलै रोजी संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे सागाच्या ४५० रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनपाल विलास मुळ्ये यांनी दिली.
वृक्ष लागवडीचे महत्व शासनालाही उमजून आले आहे. याचा एक भाग म्हणून सर्व विभागांना वृक्ष लागवड करण्याचे आदेश देऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देवरूख वन विभाग कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील कोसुंब येथे सागाच्या ४५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
कोसुंब येथील सखाराम विठ्ठल जाधव यांच्या मालकीच्या जागेत २००, तर जगन्नाथ लक्ष्मण जाधव यांच्या मालकीच्या जागेत सागाच्या २५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपणप्रसंगी सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)