कोरोनाला विसरून चिपळूणकर खरेदीसाठी बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:27 PM2020-11-11T19:27:22+5:302020-11-11T19:28:35+5:30
ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा घटल्याने जनमानसात त्याची भीतीही कमी झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी येथील बाजारपेठेत होणारी तोबा गर्दी त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. मात्र ही खरेदी करताना ग्राहकांकडून शासनाचे आदेश आणि सूचनांची पायमल्ली सुरू असून सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला आहे.
चिपळूण : ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा घटल्याने जनमानसात त्याची भीतीही कमी झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी येथील बाजारपेठेत होणारी तोबा गर्दी त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. मात्र ही खरेदी करताना ग्राहकांकडून शासनाचे आदेश आणि सूचनांची पायमल्ली सुरू असून सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला आहे.
कोरोनामुळे गेले आठ महिने सर्वच सण व उत्सवांवर मर्यादा आली होती. मात्र ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोना बाधितांची संख्या घटल्याने नागरिक दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे दिवाळी सण साधेपणात व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करावा, अशा सक्त सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत.
मात्र नागरिकांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू, साहित्य खरेदी करताना या नियमांचे व सूचनांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी रस्त्यांलगत आपला माल व साहित्य विक्रीसाठी ठेवला आहे. त्यातच शेकडो दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत.
येथील बाजारपेठेतील चिंचनाका, जुना बस स्थानक, भाजी मंडई, गांधी चौक, गल्ली, नाथ पै चौक परिसरात मोठी गर्दी होऊ लागली आहे. यावर्षी रस्त्यालगत फटाक्यांचे स्टॉल उभारलेले नाहीत. ठराविक दुकानांमधून फटाके विक्री सुरू आहे. त्यामुळे तेथेही गर्दी होत आहे.
अजूनही कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे सणानिमित्त घराबाहेर पडून नागरिकांनी गर्दी करू नये. उलट अशा परिस्थितीत केवळ व्यापारीच नव्हे तर नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी. अजूनही काही प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने प्रत्यकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
जयराज सूर्यवंशी,
तहसीलदार, चिपळूण.