वैचारिक मतभेद विसरून विकास कामांसाठी पुढे या - प्रकाश खोल्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:51+5:302021-08-20T04:35:51+5:30

जाकादेवी : खालगाव - जाकादेवी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत घरपट्टी कर वेळेत भरावे, तसेच जन्म-मृत्यूची नोंद ग्रामपंचायत ...

Forget the ideological differences and come forward for development work - light up | वैचारिक मतभेद विसरून विकास कामांसाठी पुढे या - प्रकाश खोल्ये

वैचारिक मतभेद विसरून विकास कामांसाठी पुढे या - प्रकाश खोल्ये

Next

जाकादेवी : खालगाव - जाकादेवी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत घरपट्टी कर वेळेत भरावे, तसेच जन्म-मृत्यूची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात येऊन लवकर करणे शिवाय आपापसातील वैचारिक मतभेद विसरून विकासाच्या कामासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे आवाहन विद्यमान सरपंच प्रकाश खोल्ये यांनी केले आहे.

ग्रामपंचायत खालगाव येथे झालेल्या सभेत सरपंच प्रकाश खोल्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, खालगाव ग्रामपंचायतीला जाकादेवी बाजारपेठेतून चांगला कर उपलब्ध होत असतो. त्यामुळे सर्वच नागरिकांनी दिलेल्या मुदतीत घरपट्टी कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच खाेल्ये यांनी केले. खालगाव नळपाणी योजनेंतर्गत उपसमिती चांगले काम करत असून, खालगाव जुनी नळपाणी योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित ठेवण्याचं काम उपसमितीने केले आहे. त्यामुळे जुनी खालगाव नळपाणी योजना बंद न करता ती उपसमितीच्या माध्यमातून निरंतर सुरू ठेवण्याचे आवाहनही खोल्ये यांनी पाणी कमिटीच्या पदाधिकारी यांना केले, तसेच आपल्या घरातील ओला कचरा- सुका कचरा इतरांच्या आवारात न फेकता किंवा उघड्यावरती न टाकता या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने खालगाव ग्रामपंचायत आपल्या पातळीवरती ग्रामस्थांना पत्राद्वारे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत लेखी सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरपट्टी कराच्या माध्यमातूनच खालगाव ग्रामपंचायतीला चांगले उत्पन्न मिळते. त्यातून जमा-खर्चाचा समतोल साधणे सोपे जाते. शिवाय विकास कामेही करणे सोयीचे होते, असेही खाेल्ये यांनी सांगितले.

खालगाव नं.३ शाळेमध्ये कोविड विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोविडची अति सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवण्यात येणार असून, राहण्याची, पाण्याची व नाश्त्याची सोय केली जाणार आहे. भोजन व्यवस्थेसाठी व्यापाऱ्यांनी देणगी रूपाने भोजन उपलब्ध करून देण्याबाबतचे आवाहन सरपंच खाेल्ये यांनी केले. जाकादेवी परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वेळप्रसंगी स्वतःच्या खांद्यावर घेऊन गाडीपर्यंत आणण्याचे काम करणारे रोहित कोळवणकर यांना कोरोना योद्धा हा प्रतिष्ठेचा बहुमान लवकर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला युवा उपसरपंच कैलास खेडेकर ग्रामपंचायत सदस्य उमा देसाई, प्रिया महाडिक, श्रद्धा रामगडे, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, वार्ड क्रमांक एकमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Forget the ideological differences and come forward for development work - light up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.