नद्या स्वच्छतेला चळवळीचे रूप

By admin | Published: May 27, 2016 10:33 PM2016-05-27T22:33:24+5:302016-05-27T23:25:44+5:30

सामाजिक संस्था पुढे : नेवरे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोहीम सुरू

Form of movement for cleanliness of rivers | नद्या स्वच्छतेला चळवळीचे रूप

नद्या स्वच्छतेला चळवळीचे रूप

Next

रत्नागिरी : नदीपात्र सफाईसाठी सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातून ही चळवळ उभी राहत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. संगमेश्वर, दापोली, मंडणगड, चिपळूणपाठोपाठ आता रत्नागिरी तालुक्यातही सामाजिक संस्था ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्र स्वच्छता मोहीम राबवत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथील महालक्ष्मी संकल्प प्रतिष्ठान, जायंट्स ग्रुप, जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी सीटी सहेली, जायंट्स ग्रुप आॅफ धामणसे आणि रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या पाच संस्थांनी एकत्र येऊन सोमगंगा नदीपात्र स्वच्छता मोहिमेला नुकताच प्रारंभ केला आहे.
सोमगंगा नदीचे पात्र सुमारे दोन किलोमीटरचे आहे. या पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला असून, झाडेझुडुपे व कचरा साचलेला आहे. नदीपात्र खराब झाल्याने गावातील विहिरींचे पाणीही खराब होत चाललेले आहे. सध्या ही नदी कोरडी असल्याने गावातील विहिरींची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. याची झळ नेवरेवासीयांना बसत आहे. गेली कित्येक वर्षे नदी साफ न केल्याने दरवर्षी पूरस्थिती निर्माण होऊन गावातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरते.
दरवर्षी पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी नेवरेतील महालक्ष्मी संकल्प प्रतिष्ठान, जायंट्स ग्रुप आॅफ नेवरे, जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी सिटी सहेली, जायंट्स ग्रुप आॅफ धामणसे आणि रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या पाच सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन तेथील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सोमगंगा नदीपात्र स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. दोन किलोमीटर पात्रातील कचरा तसेच गाळ काढण्यासाठी होणारा खर्च या संस्था स्वत: करणार आहेत. नेवरे ग्रामपंचायतीकडून काही आर्थिक भार उचलला जाणार आहे.
मोहिमेचा प्रारंभ गुरुवारी झाला. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी सुमारे ४० टक्के गाळ, कचरा हटवण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी शाम पाटील, नेवरेच्या सरपंच ऋतुजा गुरव, उपसरपंच रामचंद्र रसाळ, महालक्ष्मी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत हर्षे, जायंट्स ग्रुप आॅफ नेवरेचे अनिकेत कडमडकर, जायंट्स ग्रुप, जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी सिटी सहेलीच्या अध्यक्षा विद्या गर्दे, जायंट्स ग्रुप आॅफ धामणसे तसेच जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश गद्रे, पाचही संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज दुसऱ्या दिवशी दोन जेसीबी लावून काम सुरू होते. या मोहिमेचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी कौतुक केले. आता अनेक गावांमधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही संस्था नदीपात्र स्वच्छतेच्या मोहिमेत पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शासनाच्या नदी पुनरूज्जीवन मोहिमेला त्यामुळे गती मिळत आहे. लोकसहभागातून संगमेश्वर, दापोली, मंडणगड, चिपळूण तालुक्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेला याआधीच प्रारंभ झाला आहे. (प्रतिनिधी)

एक्सव्हेटर यंत्र : खडपोलीतील तलावाची क्षमता वाढणार
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी खरेदी केलेल्या एक्सव्हेटर यंत्रसामग्री लोकार्पण सोहळा आणि जलयुक्तशिवार योजनेतून शिवकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खडपोली येथील शिवकालीन तलावाचा गाळ काढल्यानंतर तलावाची क्षमता ६२० दशलक्ष लीटरवरुन एक हजार ७७० दशलक्ष लीटरपर्यंत वाढणार आहे. शिवाय तलावाच्या परिसरातील विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळीसुद्धा वाढणार आहे.

पातळी वाढण्यासाठी प्रयत्न
पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजनांसह भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठीही राज्य शासनाकडून भर देण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत बळकट करुन कायमस्वरुपी पाणीसाठा निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, बोअरवेल खोदण्यासह टंचाईची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी विहीर खोदाईच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

Web Title: Form of movement for cleanliness of rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.