व्यावसायिक स्पर्धेतून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:34+5:302021-04-17T04:30:34+5:30

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी कारवांचीवाडी येथील एका दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली हाेती. व्यावसायिक स्पर्धेतून हा लुटीचा ...

A form of robbing a trader from commercial competition | व्यावसायिक स्पर्धेतून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार

व्यावसायिक स्पर्धेतून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार

Next

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी कारवांचीवाडी येथील एका दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली हाेती. व्यावसायिक स्पर्धेतून हा लुटीचा प्रकार घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. रत्नागिरीतील या दुकानदाराला अडचणीत आणण्यासाठी रचलेला हा कट होता, हे पाेलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी गुजरात येथून दाेघांना ताब्यात घेतले असून, मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भेराराम ओखाजी सुन्देशा (३८, रा.खेडशी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती. रत्नागिरी-कोल्हापूर या मुख्य मार्गावर कारवांचीवाडी येथे गेल्या महिन्यात हा गुन्हा घडला होता. खेडशी महालक्ष्मी मंदिर या भागातील महालक्ष्मी ट्रेडर्स दुकानासमोर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी येऊन थांबली. गाडीतून तिघे उतरले आणि त्यांनी दुकानमालकाला धमकावले. त्यानंतर, एकाने शस्त्राचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्यावेळी दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे १४ हजार रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी, मोबाइल आणि सीसीटीव्हीचा ड्राइव्ह घेऊन चोरटे पसार झाले.

पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू हाेता. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आकाश साळुंखे यांच्या पथकाने गुजरातमधून दोघांना ताब्यात घेतले. किशोर परमार (रा. मूळचा तळेरे-कणकवली, सध्या राजस्थान) आणि अणदाराम चौधरी (रा. मूळचा बेळगाव, सध्या राजस्थान) यांना अटक केली. मात्र, या प्रकरणातील अन्य साथीदार फरार होते.

गुन्हेगारांनी एक चारचाकी गाडी चोरली होती. त्या गाडीचा वापर करीत त्यांनी गुजरात, राजस्थानमध्येही चाेऱ्या केल्या हाेत्या. गुजरात येथील तपासणी नाक्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे पासिंग असलेली गाडी अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांना गाडीमध्ये चोरीला गेलेली काही किलो चांदी आणि एक रिव्हॉल्व्हर सापडले. पाेलिसांनी किशोर राम कालुरराम जाट (२३, रा. मालावासा थांना, पिपाड सिटी जि. जोधपूर, राजस्थान) आणि विजय मोहनलाल मेघवाल (२५, रा. चण्डावल, जि.पाली, राजस्थान) या दाेघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी यापूर्वी राजस्थानमध्ये काही तोळे सोन्याची चोरी केल्याचेही उघड झाले.

ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरात पोलिसांच्या ताब्यातील किशोर जात आणि विजय मेगवाल यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी दुसरे पथक पुन्हा चौकशीसाठी राजस्थानला जाणार असल्याचे समजते.

चाैकट

शेकडाे ताेळे साेने, चांदी, रिव्हाॅल्व्हर जप्त

या गुन्ह्यातील संशयितांनी चोरलेल्या रत्नागिरी पासिंगच्या गाडीमुळे राजस्थान आणि गुजरातमधील गंभीर गुन्हे उघडकीस आले. या सराईत गुन्हेगारांनी शेकडो तोळे सोने, काही किलो चांदीच्या आणि ३ रिव्हॉल्व्हर चोरल्याचे उघड झाले. त्यापैकी एक रिव्हॉल्व्हर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरात येथून जप्त केली आहे.

Web Title: A form of robbing a trader from commercial competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.