राज्याच्या राजकारणात बळी राज सेना पक्षाचा उदय
By अरुण आडिवरेकर | Published: April 22, 2023 07:05 PM2023-04-22T19:05:18+5:302023-04-22T19:06:00+5:30
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थापना
रत्नागिरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे शनिवारी (२२ एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बळी राज सेना पक्ष स्थापन करण्यात आला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
कुणबी समाजाेन्नती संघ, मुंबई संचालित कुणबी राजकीय संघटन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर विसे हे हाेते. व्यासपीठावर कुणबी समाजाेन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, सरचिटणीस अरविंद डाफळे, उपाध्यक्ष सदानंद काष्टे, हरिश्चंद्र म्हातले, सहसचिव अशाेक करंजे, भास्कर चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, अशाेक वालम, नंदकुमार माेहिते, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, संजय हंडाेरे, सुवर्णा पाटील, सुरेखा लाेखंडे, मनाेहर जाेशी, प्रकाश बांगरस, गिरीश माेंडे, उपस्थित हाेते.
यावेळी माजी आमदार दिगंबर विसे म्हणाले की, हा पक्ष काेकणापुरता मर्यादीत असता कामा नये. देशातील नामांकित पक्ष असला पाहिजे. आज आपण दिवा लावला आहे ताे अक्षयपणे तेवत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी उचलायची असेल तर सणासारखे वागून चालणार नाही, असे ते म्हणाले.
पक्ष अध्यक्ष अशाेक वालम म्हणाले की, काेणतीही संघटना, पक्ष पुढे न्यायचा असेल तर महिलांचा वाटा माेठा पाहिजे. त्यांना संधी दिली पाहिजे. ती संधी या पक्षाच्या माध्यमातून मिळेल. अक्षय म्हणजे कधीही न तुटणारा म्हणून आजच्या दिवशी पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.