रत्नागिरीत भाजपला धक्का बसणार?, उद्धवसेनेच्या इच्छुकांशी बाळ माने यांची गुप्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:43 PM2024-10-19T13:43:49+5:302024-10-19T13:45:30+5:30
रत्नागिरी : गेले अनेक दिवस विरोधाचा झेंडा हाती घेतलेले भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेच्या रत्नागिरी मतदारसंघातील ...
रत्नागिरी : गेले अनेक दिवस विरोधाचा झेंडा हाती घेतलेले भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेच्या रत्नागिरी मतदारसंघातील दोन इच्छुक उमेदवारांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे बाळ माने यांच्या उद्धवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.
पितृपक्षात बाळ माने यांनी मातोश्रीवर भेट दिली असल्याची जोरदार चर्चा हाती. माने यांनी या वृत्ताचे खंडनही केले नाही आणि स्वीकारही केला नाही. रत्नागिरीची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली होती. मात्र ही जागा शिंदेसेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेतील इच्छुक उमेदवार राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली.
चर्चेचा तपशील अजून जाहीर झाला नसला तरी या चर्चेमुळे माने यांच्या उद्धवसेनेतील प्रवेशाला पुष्टी मिळत आहे. उद्धवसेनेची रत्नागिरीतील इच्छुकांशी चर्चा झाल्यानंतरही उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे बाळ माने हे उद्धवसेनेकडून रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता या नव्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे.