रत्नागिरीत महायुतीला धक्का; भाजपचे माजी आमदार बाळ माने उद्धवसेनेत
By मनोज मुळ्ये | Published: October 23, 2024 05:16 PM2024-10-23T17:16:42+5:302024-10-23T17:17:31+5:30
रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. रत्नागिरीच्या उमेदवारीसाठी ...
रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. रत्नागिरीच्या उमेदवारीसाठी ते अधिक उत्सुक होते. मात्र रत्नागिरीत उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित असल्याने बाळ माने यांनी उद्धवसेनेत प्रवेश करण्याची तयारी केली होती. त्यानुसार बुधवारी ते उद्धवसेनेत दाखल झाले.
अनेक वर्षे भाजपमध्ये काम करणा-या बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने एकमेकांसमोर निवडणुकीला उभे होते. त्यात बाळ माने यांचा पराभव झाला. त्यानंतर ते बराच काळ मुख्य प्रवाहातून बाजूला पडले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकांआधी ते पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी भाजपचा प्रचार सुरू केला.
लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते उत्सुक होते. तेथे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. मात्र येथील आमदार महायुतीचाच असल्याने ही जागा शिंदे सेनेला म्हणजेच उदय सामंत यांना जाणार हे निश्चित होते. त्यामुळे बाळ माने यांनी उद्धव सेना किंवा अपक्ष असे मार्ग हाताळण्याचा निर्णय घेतला.
उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे साडू असलेले बाळ माने पितृपक्षात उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत रत्नागिरीतील पदाधिका-यांनी माने यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे अलिकडेच पुन्हा एकदा सर्व स्थानिक पदाधिका-यांची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यात उमेदवारीबाबत त्यांची समजूत काढण्यात आली.
बुधवारी माने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव सेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार विनायक राऊत, माधवी माने, भास्कर जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव, बाळ माने यांचे सुपुत्र विराज आणि मिहीर माने उपस्थित होते.