उद्धव ठाकरे यांच्या सभेची परवानगी नाकारली; बारसूमध्ये आता होणार फक्त ग्रामस्थांशी संवाद
By मनोज मुळ्ये | Published: May 5, 2023 02:46 PM2023-05-05T14:46:20+5:302023-05-05T14:46:27+5:30
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बारसू येथे सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवार दिनांक ६ मे रोजी उद्धव ठाकरे बारसू येथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी येणार आहेत.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या लोकांना भेटण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे बारसू येथे येणार आहेत. यावेळी तेथे सभा घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र बारसू येथील आंदोलन तसेच सण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या आधीच जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे ठाकरे यांना बारसू येथे सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने बारसू येथे दाखल होणार आहेत ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दुपारी अडीच वाजता हेलिकॉप्टरने ते महाडकडे जाहीर सभेसाठी रवाना होणार आहेत.