माजी मुख्याध्यापकांना दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:20+5:302021-04-14T12:12:10+5:30
Rajapur Ratnagiri : माहिती अधिकारात मागवलेली माहिती योग्य वेळेत न दिल्यामुळे आडिवरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुनील बाबूराव दबडे यांना राज्य माहिती आयोगाने दहा हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
राजापूर : माहिती अधिकारात मागवलेली माहिती योग्य वेळेत न दिल्यामुळे आडिवरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुनील बाबूराव दबडे यांना राज्य माहिती आयोगाने दहा हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
बापू हरिबा नानगुरे यांनी मॅट्रिकपूर्व गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई शिष्यवृत्ती प्रस्तावाबाबत माहिती मागवली होती. सदर शिष्यवृत्ती प्रस्ताव विहित मुदतीत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजापूर यांच्याकडे सादर केले नसल्याचे उघड झाले. याबाबतची माहिती सुनील दबडे यांनी योग्य मुदतीत दिली नाही. यासाठी शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. प्रथम अपिलाच्या सुनावणी आदेशानुसारही योग्य माहिती दिली न गेल्याने राज्य माहिती आयोगाकडे अपील करण्यात आले होते.
राज्य माहिती आयोगाने माहिती देण्याचे आदेश देऊनही माजी मुख्याध्यापक सुनील दबडे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. राज्य माहिती आयोगाच्या या आदेशानंतर तब्बल एक वर्ष चार महिने एक दिवस एवढ्या विलंबाने माहिती अपीलकर्त्याला देण्यात आली.
याबाबत राज्य माहिती आयोगाकडे जनमाहिती अधिकारी यांना शास्ती लावण्यासाठी अपील करण्यात आले. सदर अपिलाच्या सुनावणीमध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चे उल्लंघन केल्याचे उघड झाले. तसेच मुख्याध्यापकांनी आपल्या कर्तव्यात कुचराई करत असल्याचे आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले. दंडापोटी करण्यात आलेली रक्कम त्यांच्या वेतनातून एका मासिक हप्त्यात वसूल करण्याचे स्पष्ट आदेश राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी नुकतेच दिले आहेत.