Nilesh Rane: अंगावर आल्यास कुणालाही सोडत नाही, निलेश राणे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:09 PM2022-03-26T18:09:43+5:302022-03-26T18:52:42+5:30
आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे.
खेड : पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आणि आमच्या अंगावर आल्यास आम्ही कुणालाही सोडत नाही. आम्हाला आव्हान देण्याचे कारण काय ? तुम्ही कोण ? तुम्हाला शिवसेनेत जायचे आहे. म्हणून तुम्ही अशी भाषा वापरता की काय ? अशा रोखठोक भाषेत भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते भरणे नाका येथील हॉटेल बिसू येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, दापोलीत जी कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. त्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात प्रशासनाने काय केले. याचा जाब विचारण्यासाठीच किरीट सोमय्यादापोलीत आले आहेत. त्यामध्ये कुणाच्याही पोटात दुखायची गरज नाही. तुम्ही कोण आम्हाला आव्हान देणार तुम्हाला शिवसेनेत जायचे आहे. म्हणून असे बोलता की काय ? असे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचे नाव न घेता राणे यांनी सवाल उपस्थित केला.
दापोलीतील अनधिकृत मालमत्ता ही मनीलॉड्रींगच्या व्यवहारातून घेतली आहे. तेथूनच या प्रकरणाची सुरुवात झाली आहे का ? या मालमत्तेसाठी पैसा आला कुठून याची चौकशी होणे गरजेचे आहे. उद्या दुबई, पाकिस्तानातील लोक दापोलीत येतील आणि मालमत्ता उभी करतील ते आपल्याला चालणार आहे का, असे राणे म्हणाले.
आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे, असेही राणे म्हणाले.
यावेळी विनोद चाळके रामदास राणे, राजू रेडीज, वैजेश सागवेकर, अनिकेत कानडे, रोहन राठोड, अविनाश माने, भूषण काणे, राकेश पाटील, दादा धामणकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.