चाळीस हजार खर्ची; पण, साहित्यच नाही!
By admin | Published: April 11, 2017 12:32 AM2017-04-11T00:32:19+5:302017-04-11T00:32:19+5:30
अधिकाऱ्यांनी हात झटकले; जि.प. महिला, बाल कल्याण समिती सभापतींच्या निवासातील प्रकार
रत्नागिरी : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतींच्या निवासस्थानातील सामान खरेदीसाठी ४० हजार रुपये खर्ची पडले असले तरी ते सामान मात्र अजूनही सभापती निवासस्थानात आलेच नसल्याची बाब पुढे आली आहे. महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र बांधकाम विभागाकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली़
महिला व बालकल्याण विभागात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. या विभागाने जिल्हा परिषद सेसफंडातून २० लाख रुपयांचे निकृष्ट दर्जाचे पल्वरायझर खरेदी करून लाभार्थ्यांच्या माथी मारले होते. तत्कालीन सभापती दुर्वा तावडे यांच्या काळात होम लाईट खरेदी केले गेले. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले होम लाईट निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले. लाखो रुपयांच्या सायकल खरेदी करण्यात आल्या. मात्र, पुरवठादाराने काही सायकल गंजलेल्या अवस्थेतच दिल्या. याच सायकल पुरवठादाराने पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीला कमी दर्जाच्या सायकलींचा पुरवठा केला होता. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी हात वर केले होते.
महिला व बालकल्याण विभागाने गेल्या काही वर्षांत केलेली वस्तू, सामान खरेदी वादग्रस्त ठरली असल्याने महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती ऋतुजा खांडेकर यांच्यासाठी कामाचे आव्हानच आहे. तत्कालीन सभापती तावडे यांच्या कालावधीतील आणखी एका खरेदी प्रकरणाची जोरदार चर्चा परिषद भवनात सुरू आहे. या सभापतींच्या टीआरपी येथील निवासस्थानासाठी बेड, खुर्च्या, पडदे व इतर सामान खरेदी करण्यासाठी ४० हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र, हे सामान सभापती निवासस्थानात नाही, अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.
याबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या खर्चाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगत त्यांनी बांधकाम विभागाकडे बोट दाखविले आहे. सामान खरेदी झाले की नुसतीच बिले सादर झाली, सामान खरेदी झाले तर ते सभापती निवासस्थानात का नाही, असे प्रश्न आता जिल्हा परिषदेत चर्चिले जात आहेत. (शहर वार्ताहर)