लांजात गांजाचे सेवन करणाऱ्या चाैघांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 18:24 IST2023-05-13T18:23:48+5:302023-05-13T18:24:36+5:30
लांजातील चिंतामणी हॉस्पिटलच्या मागील बाजूला चिरेबंदी कंपाऊंडच्या मोकळ्या जागेत चाैघे अंधारामध्ये सिगारेट ओढत असल्याचे गस्तीवरच्या पोलिसांनी पाहिले.

लांजात गांजाचे सेवन करणाऱ्या चाैघांच्या मुसक्या आवळल्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : गांजा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या चाैघांना गस्तीवर असलेल्या लांजा येथील पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २६.०९ ग्रॅमचा गांजा आढळला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१२ मे) सायंकाळी ७:५० वाजता करण्यात आली.
लांजातील चिंतामणी हॉस्पिटलच्या मागील बाजूला चिरेबंदी कंपाऊंडच्या मोकळ्या जागेत चाैघे अंधारामध्ये सिगारेट ओढत असल्याचे गस्तीवरच्या पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी स्थानकात माहिती देऊन पोलिसांची कुमक मागविली. पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाॅन्स्टेबल भालचंद्र रेवणे, अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन पवार, राजेंद्र वळवी, श्रीकांत जाधव, अमोल दळवी, बापूसाहेब काटे, प्रतीक्षा राणे आणि होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच चाैघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारही बाजूंनी पोलिस असल्याने कुणालाही पळता आले नाही.
या कारवाईत पाेलिसांनी एमाननुरी अहंम्मदवकील उजीज ऊर्फ मौलू (वय २२, रा. वैभव वसाहत, लांजा, मूळ रा. औरंगाबाद), प्रमोद यशवंत गुरव (३९, रा. देवधे), विनायक प्रकाश कुरुप (२८, रा. लांजा), उमेश सुभाष गांगण (४२, रा. भांबेड, लांजा) यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडे गांजाच्या दोन फोडलेल्या पुड्या सापडल्या. त्यामध्ये ४.२४ ग्रॅम व २.७६ ग्रॅम, तर पॅकबंद १०.७४ ग्रॅम व ८.३५ ग्रॅम गांजा सापडला. अधिक तपास पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे करत आहेत.