खासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनी, रत्नागिरी जिल्ह्यात टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:27 PM2019-06-10T16:27:02+5:302019-06-10T16:30:44+5:30
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनचे उशिराने होत असलेल्या आगमनाने टंचाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. धरणांमधील पाणीसाठा संपल्याने नळपाणी योजना ठप्प आहेत, विहिरी आटल्या आहेत.
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनचे उशिराने होत असलेल्या आगमनाने टंचाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. धरणांमधील पाणीसाठा संपल्याने नळपाणी योजना ठप्प आहेत, विहिरी आटल्या आहेत.
आशेचा किरण असलेल्या खासगी विहिरींमधील साठाही संपुष्टात आला आहे. त्यातच अनेक खासगी विहिरी व खासगी पाणीवाहू टॅँकर शासनाने अधिग्रहित केल्याने खासगी टॅँकरचे पाणीही नंबर लावून ४-४ दिवस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी तहानेने घसा सुकण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रत्नागिरीसह जिल्हाभरात यंदा गेल्या काही वर्षांमधील सर्वाधिक भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ४६ लघु व तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्याजवळ उभारलेल्या जॅकवेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक नळपाणी योजनांना पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, धरणांमधील पाणीसाठाही कमालीचा घटला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शासकीय धरणे व अन्य जलस्रोतांवर चालणाऱ्या नळपाणी योजनाही ठप्प आहेत. काही योजनांना जेमतेम पाणी मिळत आहे. काही ठिकाणी १ ते ४ दिवसांआड अल्प प्रमाणात पाणी पुरवले जात आहे. पाणी पुरवठ्याची स्थिती भयावह आहे.
खासगी टॅँकर, विहिरी अधिग्रहित
जिल्ह्यात पाणीटंचाई स्थितीवर मात करण्यासाठी खासगी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारी अनेक वाहने अधिगृहित करण्यात आली आहेत. तसेच पाणीसाठा असलेल्या खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही खासगी टॅँकरना पाणी मिळणे कठीण झाले आहे. नळयोजनांना पाणी मिळत नाही, घराकडील विहिरीही आटल्या आहेत.
खासगी पाणीपुरवठा अडचणीत
रत्नागिरी शहर व परिसरात खासगी पाणीपुरवठा करणारे अनेक टॅँकर कार्यरत आहेत. अधिग्रहित न केलेले कमी संख्येतील खासगी टॅँकरही तासन्तास खासगी पाणी पुरवठादारांकडे रांगेत उभे असलेले दिसून येत आहेत. खासगी पुरवठादारांच्या विहिरींमधील पाण्याची पातळीही कमालीची खालावली आहे.
पाण्यासाठी प्रतीक्षा वाढली
विहिरींमधील पाणी खालावल्याने खासगी टॅँकरचे हजार लीटर पाणी मिळवायलाही बुकिंगनंतर तब्बल ४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर ५ हजार लीटरचा पाण्याचा टॅँकर मिळविण्यासाठी तब्बल आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने दरही वाढले आहेत. हजार लीटर पाण्यासाठी ४०० रुपये मोजावे लागत आहेत तर ६ हजार लीटर पाण्यासाठी हजार रुपये मोजावे लागत आहेत.
टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या अधिक
जिल्ह्यात ११० गावांमधील ११५ वाड्या टंचाईग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात टंचाईग्रस्त वाड्यांची ही संख्या १९५ पर्यंत आहे. तालुके, टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या याप्रमाणे - खेड २८ गावे, ४८ वाड्या, चिपळूण १७ गावे, ३१ वाड्या, लांजा ७ गावे, १४ वाड्या, दापोली २४ गावे, ४३ वाड्या, गुहागर २ गावे, ९ वाड्या, संगमेश्वर १८ गावे, ३३ वाड्या. टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी ७ शासकीय टॅँकर व १३ खासगी टॅँकर उपलब्ध आहेत.
पाण्याची पातळी खालावली
खासगी विहिरींचे पाणीपुरवठा करणारे अनेकजण रत्नागिरीत आहेत. पाणी पुरवठादार महागावकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, दोन ते तीन तासांमध्ये १० हजार लीटरचे ४ टॅँकर म्हणजेच ४० हजार लीटर पाणी भरून होत असे.
आता त्याचवेळात हजार लीटरचे दोन टॅँकरही भरताना मुश्कील झाले आहे. पाणी भरल्यानंतर पुन्हा विहिरीचे पाणी उपसणे दोन ते तीन तास बंद ठेवावे लागते. त्यानंतर काही प्रमाणात पाणीसाठा होतो. झऱ्यांना पाणीच कमी झाले आहे.