CoronaVirus Lockdown : तब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:22 PM2020-04-03T17:22:16+5:302020-04-03T17:23:09+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना लांजा पोलिसांनी अडवून त्यांना जेवणाची सोय केली आहे.
अनिल कासारे
लांजा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना लांजा पोलिसांनी अडवून त्यांना जेवणाची सोय केली आहे.
कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद होत चालले असताना कोरोनाचा प्रसार थांबविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान यांनी भारत देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. यानंतर मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. काम गेल्याने आता करायचे काय ? हातात पैसे नसल्याने पोटाची खळगी भरायची कशी, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी काम करत असलेल्या जागेवरून स्थलांतर करून आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तहान - भूक विसरून आपल्या गावच्या ओढीने कामगार मैलोनमैल पायपीट करत आहेत.
हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे काम बंद झाल्याने त्यांना आपल्या मालकांनी वाऱ्यावर सोडल्याने आता करायचे काय? काम गेले, येथे राहूनदेखील काम नाही. अजून असलेले लॉकडाऊन पुढे किती दिवस चालू राहील, याचा अंदाज नसल्याने त्यांनी गावच रस्ता धरला. गोवा येथून दीपक रामलाल सावू (वय ३५), प्रकाश किसन धुमाळे (वय ५५), तसेच कणकवली येथून राजेश वसंत गावडे (वय ५०), विक्रम वसंत परब (वय ३०) यांनी आठ दिवसांपासून पायी चालायला सुरुवात केली.
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तहान भूक हरपलेल्या या लोकांनी रस्ता कापण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी आसऱ्याला थांबून सकाळी पुन्हा चालायला सुरूवात करत होते. असे करत ते पुढे पुढे जात होते. गेले आठ दिवस मिळणारे पाणी पिवून जवळपास २०० ते २५० किलोमीटर अंतर त्यांनी कापले होते.
लांजा तालुक्यातील मठ येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू ओढवला. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळुंखे हे मंगळवारी दुपारी भेटीसाठी मठ येथे जात होते. त्याचवेळी त्यांना आंजणारी घाटात चार लोक चालत चालले असल्याचे लक्षात आले. त्यांनी लांजा पोलीस स्थानकात संपर्क साधून कल्पना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती सांभाळणारे पोलीस हवालदार नितीन पवार यांनी चालक चेतन घडशी यांना घेऊन आंजणारी गाठली.
तेथून या चारही लोकांना गाडीमध्ये घेऊन लांजा पोलीस स्थानकात आणले. त्यांची चौकशी केली असता गेले आठ दिवस या लोकांना जेवण मिळाले नव्हते. नितीन पवार यांनी या चारही लोकांना पोटभर जेवण दिले. तुम्ही कुठून कुठे जात आहात, याची चौकशी केली असता गोव्याहून पनवेल येथे जाणार आहोत, असे सांगताच पवार यांना धक्का बसला.
साधारण चार जणांपैकी दोघेजण हे ५० व ५५ वर्षांचे आहेत. एवढ्या वयाच्या माणसाने उपाशीपोटी एवढे अंतर कापणे अशक्य आहे. मात्र, जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची सवय असलेल्या या प्रौढांनी तरूणांना लाजवेल, एवढे अंतर कापण्याचा जणू काही विक्रम केला आहे.
आश्वासनानंतरही
लांजा पोलिसांनी या चारही जणांचा अहवाल लांजा तहसीलदार वनीता पाटील यांच्याकडे दिला आहे. जे लोक अडकून पडले आहेत, त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलेले असतानाही कामगारांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावाकडे जाताना रस्तोरस्ती दिसून येत आहे.
पोलिसांची सहृदयता
गोव्याहून चालत आलेले चौघेजण आठ दिवस उपाशी असल्याचे समजल्यानंतर लांजा पोलीस नितीन पवार यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. एकूणच पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण वाढलेला असतानाही पोलिसांनी दाखवलेल्या या सहृदयतेची चर्चा लांजात सुरू आहे.