CoronaVirus Lockdown : तब्बल ३५ वाहनचालकांचे परवाने निलंबित, दुचाकी केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 01:41 PM2020-04-06T13:41:52+5:302020-04-06T13:43:23+5:30
विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता अत्यंत कडक भूमिका घेतल आहे.
विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाने सर्वांचेच जगणे मुश्किल केले आहे. हे संकट थोपविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनेक राजकीय, धार्मिककार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक नागरिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत आहेत. मात्र, काहीजणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० मार्चपासून रत्नागिरी शहरात विनाकारण किवा अत्यंत क्षुल्लक कारणे देत रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्यांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या १५ दिवसांच्या काळात पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी तसेच तीनचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याअंतर्गत ५ हजारपेक्षा अधिक वाहनांकडून २० लाखांपर्यंत दंड वसुली करण्यात आली आहे.
त्यानंतरही वाहतूक नियम मोडण्याचे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण येणाऱ्या वाहनांची हवा सोडणे, गांधीगिरी करून वाहनधारकांना हात जोडून विनंती करणे यांसारखे अनेक उपाय योजण्यात आले. त्यानंतर आता वाहनांना जॅमर बसविण्यात आले आहे.
विनाकारण रस्त्यावर येणारी वाहने दंड झाल्यानंतरही पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्याने त्यांच्यावर अधिक कठोर कारवाईचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ही वाहनेच जप्त करून ठेवली तर पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, हे लक्षात घेऊन आता वाहनांवर जप्तीची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, संबंधित वाहनचालकांचे वाहतुकीचे परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.
दरम्यान शहरातील व परिसरातील बहुतांश लोक हे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करीत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, घरात थारा न होणारे व संचारबंदी काळात शहरातील मोकळ्या रस्त्यांची पाहणी करण्यात व पोलिसांना कसे चकविले, यामध्ये धन्यता मानणाऱ्यांवरच आता पोलिसांचे लक्ष आहे. संचारबंदी काळात नाहक फेरफटका मारणाऱ्या व पोलिसांचे काम वाढविणाऱ्या या बेजबाबदार लोकांवर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कारवाई सुरूच राहणार आहे.
कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शिवखोल व राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात थांबली आहे. शहरात अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना रस्त्यावर येण्यास परवानगी नाही. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
- अनिल विभुते,
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा