रत्नागिरीत व्हेल माशाच्या उलटीसह सिंधुदुर्गातील चौघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:03 PM2023-11-09T14:03:14+5:302023-11-09T14:03:30+5:30
रत्नागिरी : शहरानजीक चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या सिंधुदुर्गातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ...
रत्नागिरी : शहरानजीक चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या सिंधुदुर्गातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिसांनी सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:५५ वाजता करण्यात केली. या चौघांकडून मोबाइल, रोख रक्कम आणि व्हेल माशाची उलटी असा एकूण १८.०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये विकास अनंत मेस्त्री (४८, रा.देवगड सिंधुदुर्ग), समीर विठ्ठल तेली (३९, रा.मालवण, सिंधुदुर्ग), राजेश मोतीराम जगताप (३४, रा.देवगड, सिंधुदुर्ग) आणि महेश मनोहर ठुकरुल (४८, रा.देवगड, सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सोमवारी सायंकाळी शहरानजिकच्या चंपक मैदान येथे काहीजण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडोंची किंमत असलेल्या व्हेलमाशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार,ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. सायंकाळी चार जण त्याठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी सापडली. या चार संशयितांकडून ४ मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण १८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९ (ब), ५७, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.