शिंदेंआंबेरी येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात आरोग्य कर्मचाऱ्यासह चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:04+5:302021-06-09T04:39:04+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गानजीक शिंदेआंबेरी येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन कर्मचाऱ्यांसह चौघे जखमी ...
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गानजीक शिंदेआंबेरी येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन कर्मचाऱ्यांसह चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. कडवई येथील मंडप डेकोरेटर्सचे विजय कुवळेकर यांनी प्रसंगावधान राखत आरोग्य कर्मचारी विश्वनाथ जाधव यांना दवाखान्यात दाखल केल्याने अनर्थ टळला.
महामार्गावरील शिंदेआंबेरी येथे साफसफाईचे काम सुरू असताना तुमसर जातीच्या मधमाश्यांच्या पाेळ्याला धक्का लागला़ पाेळ्यातून मधमाश्या उठल्याने लोकांनी तेथून पळ काढला़ त्याचवेळी रवींद्र खसासे व दामू खसासे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला आणि त्यात ते जखमी झाले.
याच मार्गावरून दुचाकीवरून शिंदेआंबेरीकडून तुरळकडे लसीकरणासाठी जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी विश्वनाथ जाधव व रेखा भुवड यांच्यावरही या माश्यांनी हल्ला केला. माश्यांनी हल्ला करताच हे कर्मचारी घाबरून गेले. रेखा भुवड यांनी जवळच शेतात काम करत असणाऱ्या लोकांकडे धाव घेतली, तर जाधव यांनी महामार्गावर येऊन मदतीसाठी याचना केली़ मात्र, कोरोनाकाळ आणि जाधव यांना माश्यांनी घेरलेल्या विचित्र स्थितीमुळे वाहनचालकांनी दुर्लक्ष केले.
त्याचवेळी विजय कुवळेकर यांच्या निदर्शनास ही बाब आली़ प्रसंगावधान राखत त्यांनी त्याच स्थितीत जाधव यांना गाडीच्या डिकीत बसायला सांगून कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. आरोग्य अधिकारी संतोष यादव आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ जाधव यांच्यावर उपचार सुरू केले. त्यामुळे जाधव हे मोठ्या धोक्यातून वाचले, तर रेखा भुवड यांना उपचारासाठी सावर्डे येथे हलविण्यात आले तर इतर दोघांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. या घटनेची माहिती मिळताच प्रकाश पुरोहित, राजू रेडीज, मिलिंद चव्हाण, सागर गुरुपादगोळ, पप्पू सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेतली़